'...म्हणून मी होळी खेळणं बंद केलं', मराठमोळ्या अभिनेत्रीने केला खुलासा

संपूर्ण भारतात होळीचा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध मंडळी देखील मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करताना दिसतात. 

Updated: Mar 21, 2024, 05:12 PM IST
'...म्हणून मी होळी खेळणं बंद केलं', मराठमोळ्या अभिनेत्रीने केला खुलासा title=

Sharayu Sonawane On Holi Festival : मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळीला मानले जाते. संपूर्ण भारतात होळीचा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. यंदा 24 मार्चला होळी आणि 25 मार्चला धुलीवंदन हा सण साजरा होणार आहे. अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध मंडळी देखील मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करताना दिसतात. यानिमित्ताने मराठमोळी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ती रंगपंचमी आणि होळी कशी साजरी करते याबद्दल वक्तव्य केले आहे. 

छोट्या पडद्यावरील पारु या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील सर्वच कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या मालिकेत पारु हे पात्र साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणेने होळी सणाबद्दल तिचे मत व्यक्त केले. यावेळी शरयूने रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळणं कायमचं बंद केल्याचे वक्तव्य केले. तिने असं करण्यामागे असलेले खास कारणही सांगितले आहे. 

"मी रंगाचा एक टिळा नक्की लावते"

"मी लहान असताना होळी खेळायचे. तसेच रंगपंचमीलाही खूप मज्जामस्ती करायचे. पण त्यावेळी यात वापरले जाणारे हानिकारक रंग आणि त्यामुळे त्वचेला तसेच मुक्या जनावरांना होणारा त्रास माझ्या लक्षात आला. यानंतर मग मी होळी, रंगपंचमी खेळणं कायमचे बंद केले. मी लहानपणी मनाला येईल, तशी होळी खेळायचे. कोणताही रंग वापरायचे. कोणत्याही पाण्यात होळी खेळायचे. पण जेव्हा मला कळायला लागेल तेव्हापासून मी होळी खेळणं बंद केलं. माझ्या घरी माझा पाळीव प्राणी आहे, त्याला बघून समजायला लागले की प्राण्यांना रंगांचा त्रास होतो. माझ्या पाळीव प्राण्याला जर त्रास झाला तर तो मला कदाचित सहन होणार नाही. त्यामुळे मी होळी खेळणं बंद केलं. पण मी रंगाचा एक टिळा नक्की लावते", असे शरयू सोनावणेने म्हटले. 

"त्यासोबतच मी सर्वाना सांगू इच्छिते की, होळी खेळताना तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या. त्यांना रंग लावू नका. मी खऱ्या आयुष्यात जरी होळी खेळत नसले तरी यंदा मालिकेत रंग खेळताना दिसणार आहे. आम्ही मालिकेच्या सेटवर नैसर्गिक रंगांचा वापर करत रंगाची उधळण करणार आहे", असेही ती म्हणाली. 

पारुच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती

दरम्यान, ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतून शरयू सोनावणे प्रसिद्धीझोतात आली. यात तिने पिंकी हे पात्र साकारले होते. सध्या शरयू ही झी मराठीवरील 'पारु' या मालिकेत झळकत आहे. यात तिने पारु हे पात्र साकारताना दिसत आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शरयूने मालिकांव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.