'सोनालीसोबतच्या अफेअरविषयी पहिलं आणि शेवटचं सांगतो......'

शोएब अख्तरचा मोठा खुलासा

Updated: Jun 19, 2019, 09:29 AM IST
'सोनालीसोबतच्या अफेअरविषयी पहिलं आणि शेवटचं सांगतो......' title=

मुंबई : भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगत होत्या. याच चर्चांमध्ये एक विषय कला आणि क्रीडा जगताचं लक्ष वेधून गेला. तो विषय होता, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्या अफेअरचा. 

शोएब आणि सोनाली यांच्या अफेअरशिवाय, तो तिचं अपहरण करणार असल्याच्या चर्चाही माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. ज्यावर आता खुद्द शोएबनेच स्पष्टीकरण दिलं आहे. एका युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून त्याने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 'सोनालीसोबतच्या अफेअरविषयी पहिलं आणि शेवटचं सांगतो......', असं म्हणत त्याने जाणिवपूर्वकरित्या युट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट केला. 

सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरच्या चर्चा या खोट्या असल्याचं तो व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणत आहे. किंबहुना आपण सोनाली बेंद्रे यांना कधीच भेटलो नसल्याचंही तो म्हणाला. सोनालीचा फोटो आपल्या पाकिटात कधीच नव्हता ही बाब त्याने स्पष्ट केली. सोनाली ही एक खुप चांगली आणि तितकीच सुंदर अभिनेत्री आहे. पण, मी कधीच तिच्या चाहत्यांपैकी एक नव्हतो, असंही त्याने म्हटलं आहे. 

शोएबच्या खोलीतील भिंतींवर सोनालीचे फोटो असल्याची बाबही या व्हिडिओच्या माध्यमातून धुडकावून लावण्यात आली आहे. आपण फक्त एकाच व्यक्तीचे फोटो लावले, ते म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान ही बाब त्याने अधोरेखित केली. 

सोनालीविषयी आपल्याला फार माहिती नसल्याचं म्हणत शोएबने तिच्या आजारपणाविषयीही वक्तव्य केलं. कॅन्सरच्या आजाराला तिने ज्या धीराने लढा दिला हे पाहता त्याने तिच्या लढाऊ आणि धाडसी वृत्तीची प्रशंसा केली.  याच व्हिडिओमध्ये त्याने इतरही मुद्द्यांवर चर्चा केली. 

भारत- पाकिस्तान सामन्यांदरम्यान प्रत्येक वेळी सानिया मिर्झावर होणाऱ्या टीकांवर त्याने नाराजी व्यक्त केली. शिवाय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवाविषयी काही मुद्दे मांडत त्याने संघ नेमका चुकला कुठे, हे पटवून देत संघाने गतकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचीही जोड दिली.