पंतप्रधान मोदींच्या बायोपिक मागोमाग 'नमो टीव्ही'वरही निवडणूक आयोगाची गदा

जाणून घ्या 'नमो टीव्ही' विषयी.... 

Updated: Apr 10, 2019, 07:34 PM IST
पंतप्रधान मोदींच्या बायोपिक मागोमाग 'नमो टीव्ही'वरही निवडणूक आयोगाची गदा  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चरित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे. बायोपिकसाठी लागू करण्यात आलेली ही नियमावली 'नमो टीव्ही'लाही लागू करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यमान ही वाहिनी प्रदर्शित न करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिल्याचं स्पष्ट होत आहे. 

निवडणूक आय़ोगाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रमाणित सामग्रीशी संबंधित असणारं कोणतंही पोस्टर किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपात कोणत्याची उमेदावाराच्या प्रचारार्थ वापरण्यात येण्याची शक्यता आहे, त्या गोष्टी आचारसंहिता सुरू असेपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रदर्शित केल्या जाऊ नयेत असं म्हणण्यात आलं आहे. या वाहिनीच्या प्रसारणानंतरच विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर आळवत निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं होतं. 

११ एप्रिल रोजी प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेतील अडथळे सर्वोच्च न्यायालयाने दूर केले होते. पण, निवडणूक आयोगाने मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनावर हरकत दर्शवत लोकसभा निवडणुकांनंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय देण्यात आला. 

काय आहे नमो टीव्ही? 

काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या नमो टीव्ही या वाहिनीवर सर्वतोपरी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी निगडीत कार्यक्रमांचं प्रसारण केलं जातं. पंतप्रधानांच्या सर्व भाषणांत्या आणि प्रचारसभांच्या थेट प्रक्षेपणापासून त्यांच्या सरकारमध्ये उदयास आलेल्या अनेक जनहित योजनांच्या जाहिरातींपर्यंत प्रत्येक गोष्टीचं प्रसारण या वाहिनीवरुन केलं जातं. इतकत नव्हे तर, पंतप्रधानांच्या कार्याची ग्वाही देणाऱ्या चित्रपटांचंही या वाहिनीवरुन प्रसारण करण्यात येतं.