Nora Fatehi Deepfake Video Controversy : अभिनेत्री रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या इमानी नवीन याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. रश्मिकाचं प्रकरण ताजं असताना आता अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) देखील डीपफेकची शिकार झाली आहे. सोशल मीडियावर नोराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.
एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या ट्रेंडमुळे त्याचे दुष्परिणामही सातत्याने समोर येत आहेत. सध्या समोर आलेला व्हिडीओ ऑनलाईन मार्केटिंगशी संबधात आहे. Lululemon नावाच्या इंस्टाग्राम हँडलने नोराचा एक डीपफेक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नोरा ब्रँडिंग करताना दिसत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर नोराने आक्षेप नोंदवला. इन्टाग्रामवर तिने स्टोरी शेअर करत आपण या व्हिडीओमध्ये नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
पाहा Video
मागील आठवड्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो 'स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट' या गेमिंग अॅपची जाहिरात करताना दाखवण्यात आला होता. मात्र, त्याने पोस्ट करत आपण अशी जाहिरात केली नसल्याचं सांगितलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रश्मिकाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या नव्या तंत्रज्ञानची जाणीव सर्वांना झाली होती. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर टीका होताना दिसत आहे.
दरम्यान, डीपफेकबाबत केंद्र सरकार नवीन नियम (deepfake rules in india) आणत आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 16 जानेवारीला डीपफेक प्रकरणांवर 2 बैठका घेतल्याचं सांगितलं. चुकीची माहिती आणि डीपफेकबाबत नवीन आयटी नियमांमध्ये मोठ्या तरतुदी आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणं बंधनकारक आहे, अन्यथा कारवाई केली जाईल. नवीन IT नियम काही दिवसात अधिसूचित केले जातील. डीपफेक लोकशाहीसाठी नवा धोका म्हणून समोर आला आहे. डीपफेकचे निर्माते आणि ते होस्ट करणाऱ्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित केली जाईल, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं.
रश्मिकाच्या व्हिडीओचा मास्टरमाईंड सापडला
रश्मिका मंधाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणी अखेर मास्टरमाईंडला अटक करण्यात आलीय. आंध्र प्रदेशमधून 24 वर्षीय एमानी नवीन या तरुणाला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल पथकानं ही कारवाई केलीय. नवीननं चेन्नईतील नामांकित इंजिनीयरिंग कॉलेजमधून बी-टेकचं शिक्षण घेतलंय. एमानी हा रश्मिकाचा चाहता असून त्यानं तिचं फॅनपेजही सुरु केलं होते.त्याच्याकडून त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून डिलीट केलेली माहितीही रिकव्हर करण्यात आलीय.