मुंबई : भारतातील पहिल्या महिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीनवावर आधारित 'आनंदी गोपाळ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'आनंदी गोपाळ'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करत, समाजातील रूढी-परंपरा यांच्या विरोधात जाऊन आनंदी जोशी यांनी भारतातील पहिल्या महिल्या डॉक्टर होण्याचा मान मिळवला. 'आनंदी गोपाळ' या चित्रपटातून आनंदीबाई जोशी आणि गोपाळ जोशी यांच्या जीवनाची संघर्षमय गाथा या चित्रपटातून उलगडणार आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी 'आनंदी गोपाळ' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
समिर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' चित्रपटातून १३२ वर्षांपूर्वीच्या एका सामान्य जोडप्याची असामान्य कथा दाखवण्यात आली आहे. एका गरोदर महिलेला पुरूष डॉक्टरशी बोलयला संकोच वाटतो त्यामुळे मला दुसरं काही नाही तर केवळ डॉक्टरचं व्हायचं असा निश्चिय करत सुरू झालेला हा संघर्ष आणि त्यातून घडलेला आनंदीबाई ते डॉ. आनंदीबाई असा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओ प्रस्तुत 'आनंदी गोपाळ'मध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांची तर अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आनंदीबाईंची भूमिका साकरणार आहेत. आनंदीबाईंचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोपाळराव आणि आनंदीबाई यांना समाजाचा मोठा रोष पत्करावा लागला. त्यातून मार्ग काढत, पत्नीला शिकवण्यासाठी गोपाळरावांनी केलेली धडपड यातून मात करत बनलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जीनवप्रवास पाहणं प्रेरणादायी ठरणार आहे.