मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कायमच त्यांच्या अटीशर्तींवर आयुष्य जगण्याला प्राधान्य दिलं आहे. एकल मातृत्त्वाची जबाबदारी घेत आणि ती अगदी चोखपणे पार पाडत त्यांनी मुलगी मसाबा हिला मोठं केलं. मसाबा आजच्या घडीला हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते. मॉडेलिंग क्षेत्रातही तिनं तिचं नशीब आजमावलं आहे. अशा या मसाबाच्या वडिलांविषयीची एक अपेक्षा नीना गुप्ता यांनी नुकतीच सर्वांसमोर आणली.
‘रेसिंग पॅरेन्ट्स विथ मानसी झवेरी’ या वीकली पॉडकास्टमध्ये मसाबाच्या संगोपनाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल वक्तव्य केलं. ‘मला एक छान कुटुंब हवं होतं. मला माझ्या मुलीचे वडील तिच्यासोबत असणं अपेक्षित होतं. मुलीच्या वडिलांचे नातेवाईकही आमच्यासोबत हवे होते. पण, प्रत्येकजण त्यांचे त्यांचे निर्णय़ घेतो. तुम्ही तारुण्यात असताना काही गोष्टी करता. आईवडील तुम्हाला सातत्यानं भविष्य कसं असेल याबाबत सांगत असतात. पण, तुम्ही मात्र त्यांचं ऐकत नाही. मीसुद्धा नाही ऐकलं. मसाबानंही नाही ऐकलं.... त्या वयात कोणच काहीच ऐकत नाही.’
मुलांशी सतत सक्तीनं वागणंही बरं नसल्याचं सांगत माझ्यासोबतही तेच झालं, ज्यामुळं मी घरातून पळून गेले, विद्रोही झाले असंही त्या म्हणाल्या. मसाबाचं संगोपन करताना आपल्याला काही अडचणी अर्थात आल्याचं सांगत तो काही अगदी चांगला काळ होता असं नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं.
मसाबा, ही वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी आहे. नीना गुप्ता यांनी एकटीनंच मसाबाचं संगोपपन केलं. नीना गुप्ता यांच्या खासगी आयुष्यातील या वळणाबाबत त्या कायमच खुलेपणानं बोलत आल्या आहेत.