मुंबई : हास्य अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या कॉमेडी शोमध्ये आपले मनोरंजन करणारा नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu) बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर होता. सिद्धू आतापर्यंत राजकारणात व्यस्त होता. पण आता तो एका शोच्यानिमित्ताने टीव्हीवर पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. हे वृत्त अशावेळी येत आहेत की, एका नवीन कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली आहे.
या कॉमेडी शोचे नाव आहे, 'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' आणि त्याचा धमाकेदार टीझरही रिलीज झाला आहे. ज्या वाहिनीवर कपिल शर्माचा कॉमेडी शो प्रसारित होत होता त्याच वाहिनीवर हा शो येणार आहे.
दरम्यान, नुकताच 'इंडिया लाफ्टर चॅम्पियन' या नवीन कॉमेडी शोचा टीझर सोनी टीव्हीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये शोचे शीर्षक दिसत आहे, जरी त्याची थीम आणि वेळेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय यामध्ये कोणते कॉमेडियन भाग घेणार आहेत हे सांगण्यात आलेले नाही. व्हायरल होत असलेल्या या नवीन कॉमेडी शोचा टीझर येथे पाहा-
NEW SHOW ALERT!!!#India'sLaughterChampion coming soon, only on Sony TV! pic.twitter.com/UVPMbc6crt
— sonytv (@SonyTV) April 7, 2022
हा टीझरच्या समोर आल्यानंतर, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या अहवालांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा टीझर रिलीज होण्यापूर्वी कपिल शर्मा याने टीव्हीवरून ब्रेक घेतल्याच्या बातम्या येत होत्या. त्याचा शो 'द कपिल शर्मा शो' देखील काही काळासाठी बंद होऊ शकतो, असे सांगण्यात येत होते. त्याचवेळी सोनीवर येणारा हा नवा कॉमेडी शो कपिलच्या शोची जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे.