मुंबई : 'कुणी घर देता का घर' अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडत फिरणाऱ्या गणपतराव बेलवलकर या नटाची व्यथा मांडणारे नाटक अर्थातच 'नटसम्राट पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर लिखित हे मराठी नाटक सत्तरच्या दशकात रंगभूमीवर आले. त्यानंतर या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत इतिहास रचला.
आजही या नाटकाचे गारुड मराठी नाट्यरसिकांच्या मनावर कायम आहे. या नाटकाशी मराठी प्रेक्षकांचे एक हळवे नाते आहे. हे नाटक नवीन पिढीपर्यंत जावे या उद्देशाने हे पुन्हा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार आहेत. 'झी मराठी' प्रस्तुत आणि 'एकदंत' निर्मिती असलेले 'नटसम्राट' हे नाटक ४ नोव्हेंबरला रंगभूमीवर सादर होणार आहे.
'हॅम्लेट', 'अलबत्या गलबत्या' या नाटकांच्या यशानंतर झी मराठी 'नटसम्राट' हे नाटक मंचावर आणत आहे. या नाटकातील गणपतराव बेलवलकर यांची भूमिका साकारणे हे प्रत्येक नटाचे स्वप्न असते. आजवर ही भूमिका श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, उपेंद्र दाते यांनी साकारली आहे.
आता नव्याने येणाऱ्या या नाटकात गणपतरावांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मोहन जोशी पेलणार आहेत. तर गणपतराव बेलवलकर यांच्या पत्नीची म्हणजे कावेरीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज कलाकार बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर येत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन हृषीकेश जोशी करत आहेत.
येत्या ४ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर सादर होणार असून सध्या या नाटकाच्या जोरदार तालमी सुरू आहेत. मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी यांच्याव्यतिरिक्त या नाटकामध्ये सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेहेंदळे, शुभांकर तावडे, अभिजित झुंझारराव, मिलिंद अधिकारी, आशीर्वाद मराठे, सायली काजरोळकर, राम सईद पुरे हे कलाकार आहेत. या नाटकाच्या नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी प्रदीप मुळ्ये यांच्याकडे आहे. तर संगीत नरेंद्र भिडे यांचे आहे.