Nana Patekar on Naseeruddin Shah: मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट हे आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत. मराठीमधील असाच एक चित्रपट म्हणजे 'सिंहासन' ' (Sinhasan) आहे. 1979 साली सिनेमागृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजच्या परिस्थितीशीही तितकाच मिळता जुळता आहे. या चित्रपटाला 44 वर्षं पूर्ण झाली असतानाही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. दरम्यान या चित्रपटाला 44 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी काही किस्से शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा अपघात व्हावा असा मी देवाकडे नवस केला होता असा खुलासा केला.
सिंहासन चित्रपटाला 44 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, नाना पाटेकर, सुप्रिया सुळे अशा दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात 'सिहांसन' चित्रपटाशी संबंधित आठवणींना उजाळा देण्यात आला. यानिमित्तान अनेक नवे किस्से प्रेक्षकांना ऐकण्यास मिळाले.
या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी आपण नसिरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा असा देवाकडे नवस केला होता असा एक खुलासा केला. ते म्हणाले की, "एक काळ असा होता की, मी नसीरुद्दीन शहा यांचा अपघात व्हावा असा देवाकडे नवस केला होता. त्यांचा अपघात व्हावा त्यांचा हात किंवा पाय मोडावा असं वाटत होतं. याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या भूमिका मला मिळाव्या. पण असं कधीच झालं नाही. आणि त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला". नाना पाटेकर यांनी गंमतीशीरपणे हा किस्सा सांगितला. दरम्यान यावेळी त्यांनी जे ज्याच्या नशिबात आहे ते त्याच्याच पदरी पडतं. मला नंतरच्या काळात देवाने खूप काही दिलं असंही ते म्हणाले.
'सिंहासन' चित्रपटासाठी जब्बार पटेल यांनी आपल्याला तीन हजार रुपये मानधन दिलं होतं अशी माहिती नाने पाटेकर यांनी यावेळी दिली. "सिंहासन चित्रपटासाठी जब्बार पटेल यांनी मला तीन हजार रुपये दिले होते. त्यावेळी शंभर रुपयांत घरातील आम्हा चार जणांचं रेशन भरलं जात असे," असं ते म्हणाले.
"या सिनेमात मी जयराम हर्दीकरांना मारतो असं दाखवलं आहे. पण या सिनेमानंतर लगेचच त्यांचा अपघात झाला आणि त्या त्यांचं निधन झालं. त्यानंतर हर्दीकरांच्या पत्नी कित्येक वर्ष माझ्यासोबत बोलत नव्हत्या. मी मारलं आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं याचं शल्य त्यांच्या मनात होतं. पण या सिनेमाची सकारात्मक बाजू अशी की, या सिनेमानंतर मला अनेक चांगल्या सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली," असं नाना पाटेकर म्हणाले.