मुंबई : झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळेने सादर केलेला 'नाळ' हा सिनेमा संपूर्ण जगभरात गाजत आहे. फँड्री आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळेने 'नाळ' या सिनेमाची निर्मिती केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी नाळ हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला. नागराज आणि नवी कलाकृती म्हटलं की, इतिहास रचणार यात काही शंकाच नाही. असंच काहीस नाळबाबत झालं आहे. नाळ या सिनेमाने नवनवीन विक्रम रचण्यास सुरूवात केली आहे.
नाळ या सिनेमाने अगदी पहिल्या आठवड्यातच विक्रम रचला. सैराटनंतर सर्वाधिक कमाई करून ओपनिंग करणारा 'नाळ' हा सिनेमा ठरला आहे. नाळ सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 14 करोड रुपयांची कमाई केली. आता आणखीन एक पायरी वर जात या सिनेमाने 12 दिवसांत तब्बल 18.5 करोड रुपयांची कमाई केली आहे.
नाळ या सिनेमाने प्रेक्षकांची नाळ अगदी अचूक पकडली आहे. लहान मुलाचं भावविश्व उलघडणारा हा सिनेमा सगळ्यांच्याच पसंतीला पडत आहे. श्रीनिवासने चैत्याची भूमिका इतकी सुंदर साकारली आहे की, प्रेक्षकांनी त्याला उचलून धरलं आहे. नाळ या शब्दाशी प्रत्येकाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे नागराजने देखील प्रेक्षकांची नाळ चांगलीच धरली आहे.
फक्त शहरातीलच नाही तर ग्रामीण प्रेक्षकांना प्रेक्षकगृहापर्यंत घेऊन येण्याची ताकद ही नागराजमध्ये आहे. नाळ हा सिनेमा मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही प्रदर्शित झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नाळ हा सिनेमा 450 चित्रपटगृहांमध्ये 11 हजार शोच्या माध्यमातून दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.