'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Amhi Jarange Movie Release Date: मकरंद देशपांडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला  'आम्ही जरांगे' मोठ्या पडद्यावर...

दिक्षा पाटील | Updated: May 29, 2024, 03:55 PM IST
'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला title=
(Photo Credit : Social Media)

Amhi Jarange Movie Release Date: मराठा आरक्षणाच्या संघर्षगाथेची रुपेरी पडद्यावर जिवंत अनुभूती करून देणारा. आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.    

'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' 

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे. 

या चित्रपटाची संकल्पना डॉ. मधुसूदन मगर यांची असून, या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत. चित्रपटाची गीते  सुरेश पंडित, पी  शंकराम यांनी संगीतबद्ध केली आहेत. मंगेश कांगणे, सुरेश पंडित, पी शंकराम यांनी चित्रपटाची गीते लिहिली आहेत. हिंदीचे सुप्रसिद्ध दिग्गज गायक सोनू निगम, मराठी व हिंदीत नावाजलेले संगीतकार व गायक अजय गोगावले, नकाश अझीझ, आदर्श शिंदे, यांच्या सुमधुर सुरांनी चित्रपटाची गाणी स्वरबद्ध केली आहेत. 

या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही गाजलेली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी आहेत. नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठयांचा लढा हा, चित्रपट असून, या चित्रपटाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, दादा दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. 

हेही वाचा : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच 'गरजवंत मराठ्यांचा लढा' हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे अर्थातच 'आम्ही जरांगे' या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहोचली आहे, येत्या 14 जूनला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.