मुंबई : बॉलिवूड गायक आणि संगीतकार अनू मलिक यांच्यावर #MeToo अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलमधून बाहेर पडावे लागले होते. परंतु आता पुन्हा इंडियन आयडॉलचे निर्माते अनू मलिक यांना शोमध्ये घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यशराज फिल्म्स स्टूडिओ (YRF)चे दरवाजे अनु मलिक यांच्यासाठी बंद करण्यात आले आहेत. YRF स्टूडिओकडून अनू मलिक यांच्यावर बॅन लावण्यात आला आहे.
यशराज फिल्म्स स्टूडिओच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनु मलिक यांना यशराज स्टूडिओत प्रवेश करण्यास बंदी आहे. यशराज स्टूडिओ लैंगिक शोषण केलेल्या आरोपिंच्याविरोधात आहे. गेल्या वर्षीही यशराज फिल्म्सने लैंगिक छळाचे आरोप लावण्यात आलेल्या त्यांच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असलेल्या आशिष पटेललाही काढून टाकले असल्याचे' त्यांनी म्हटलंय.
अनु मलिकसह आलोक नाथ आणि साजिद खानलाही यशराज स्टूडिओमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषणाविरोधातील #MeToo मोहिम सुरु झाली. नाना पाटेकर यांच्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांवरही लैंगिक शोषण आणि छळाचे आरोप लावल्याची अनेक प्रकरणे समोर आली. यात अनेक बड्या कलाकारांची नावेही समोर आली होती.
अनू मलिक कलाविश्वातील संगीत क्षेत्रातील मोठं नाव आहे. अनु मलिक यांच्यावर लावण्यात आलेल्या मीटू आरोपांनंतर संपूर्ण कलाविश्वात मोठी खळबळ उडाली होती. अनू मलिक यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप लावले आहेत. श्वेता पंडित आणि सोना मोहापात्रानेही त्यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. परंतु या सर्व आरोपांचे अनू मलिक यांनी खंडण केले आहे.