'व्हॉट्सॲप डीपी, घरकामासाठी येणाऱ्या मावशी अन्...', 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला किस्सा

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शर्मिला ही लवकरच 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Feb 24, 2024, 10:50 PM IST
'व्हॉट्सॲप डीपी, घरकामासाठी येणाऱ्या मावशी अन्...', 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला किस्सा title=

Sharmila Shinde Instagram Post : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे नाव कायमच घेतले जाते. या मालिकेमुळे अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. याच मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात स्थान मिळवलेली एक अभिनेत्री म्हणून शर्मिला शिंदेला ओळखले जाते. या मालिकेत तिने जेनी हे पात्र साकारले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शर्मिला ही मालिका विश्वापासून दूर आहे. पण आता तिने तिच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. 

शर्मिला ही सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती घर, घरातील साफसफाई आणि काम करणाऱ्या मावशी याबद्दल किस्सा सांगताना दिसत आहे. या व्हिडीओत ती म्हणाली, "मी गेली कित्येक वर्ष मुंबईत एकटी राहत आहे. माझ्याकडे गेल्या कित्येक वर्षात घर कामाला कोणी बाई नव्हती किंवा गडी नव्हता. कारण माझ्या घरी येण्या-जाण्याची वेळ ठरलेली नसायची. त्यामुळे मी स्वत:ला एक सवय लावून घेतली होती की, 24 तासात जेव्हा-कधी मला वेळ मिळेल. त्यावेळेत मोबाईलवर एक तासाची वेळ निश्चित करायची आणि त्या एक तासात एक खोली साफ करायची. असं मी गेली कित्येक वर्ष सातत्यानं करत आहे. 

पण गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात माझ्या लक्षात आलं की, वेळ नसल्यामुळे मला आता हे करता येणार नाही. त्यामुळे मी एका मावशींना विनंती केली की, माझ्या वेळेनुसार तुम्ही माझ्या घरी काम कराल का? त्यांनीही मला होकार दिला. आता मला छान ताई मिळाल्या. त्या माझ्याकडे काम करायला लागल्या. काल त्या ताई मला म्हणाल्या, ताई तुमच्या व्हॉट्सअॅपचा डीपी बघून मला माझी मुलगी म्हणाली की, तुझ्या ताई माझ्या नवऱ्याची बायकोमधल्या जेनी सारख्या दिसतात. त्यावर मी त्यांना म्हटलं, ती मीच आहे. आधी त्यांचा विश्वास बसला नाही, मग नंतर त्यांचा विश्वास बसला. त्या खूप हसल्या आणि आज अचानक माझं घर खूप स्वच्छ झालं. मी मावशींना मागच्याच वर्षी सांगायला पाहिजे होतं की, मीच जेनी आहे, असा किस्सा शर्मिलाने सांगितला आहे. 

शर्मिलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर तिचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. दरम्यान शर्मिला ही लवकरच नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शर्मिला राजाराम, भूमिजा पाटील, सानिका काशीकर, वल्लरी आणि राकेश बापट झळकणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.