'खाल्लेल्या अन्नाला...', तेजश्री प्रधानने सांगितला फिटनेस मंत्रा, म्हणाली 'जीमवर खर्च करण्यापेक्षा...'

Tejashri Pradhan Fitness Secrate : "जर तुम्ही स्वत:च्या तब्येतीबद्दल विचार करत असाल तर सर्वात आधी स्वत:ला मानसिकरित्या खंबीर बनवा", असे तेजश्री प्रधान म्हणाली.

Updated: Jan 7, 2024, 05:49 PM IST
'खाल्लेल्या अन्नाला...', तेजश्री प्रधानने सांगितला फिटनेस मंत्रा, म्हणाली 'जीमवर खर्च करण्यापेक्षा...' title=

Tejashri Pradhan Fitness Secrate : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. तिने तिच्या अभिनयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तेजश्रीला 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे. नुकतंच तेजश्रीने तिचे फिटनेस सिक्रेट सांगितले आहे. 

तेजश्री प्रधान ही इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तेजश्री प्रधानला तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखले जाते. आता तेजश्रीने 'रेडिओ मिरची' या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितले आहे. "खाल्लेल्या अन्नाला धावत जा", असा माझा फिटनेस मंत्रा आहे, असे तेजश्रीने यावेळी म्हटले. 

"जीमवर खर्च करु नका"

"जर तुमचं डोकं ठिकाणावर नसेल, तर एक रुपयाही जीमवर खर्च करु नका. कारण तुम्ही ते पैसे वाया घालवत आहात. आताच्या काळात मानसिक आरोग्य हा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जाणारा विषय आहे, असे मला वाटते. जर तुम्ही स्वत:च्या तब्येतीबद्दल विचार करत असाल तर सर्वात आधी स्वत:ला मानसिकरित्या खंबीर बनवा. मानसिकरित्या शांत आणि छान ठेवा. त्यानंतर बाकीच्या सर्वच गोष्टी होतात", असे तेजश्री प्रधान म्हणाली.

"मोबाईल घरातच ठेवा आणि..."

"मला असं वाटतं की, सकाळी धावायला जाणं हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला फक्त बुट महत्त्वाचे असतात. इतर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला गरज नसते. मला योगा मॅट हवी, महागडे कपडे हवेत, जिमला जायचं यातील कोणत्याही गोष्टींची गरज भासत नाही. तुम्ही पहाटे बाहेर पडा, मोबाईल घरातच ठेवा. सकाळी धावताना वाऱ्याचा आवाज ऐका. कारण सकाळच्या त्या अर्ध्या तासाच्या वेळेत बाकीच्या आवाजाशिवाय मला स्वत:चा आवाज फार स्पष्टपणे ऐकायला येतो. त्यामुळे सकाळी बाहेर जा, वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने धावा, हे फार चांगलं असतं", असा सल्लाही तेजश्रीने दिला.

"यामुळे तुमचा दृष्टीकोन बदलतो आणि तो कसा बदलतो हे तुम्हालाही समजत नाही. यासाठी तुम्हाला वेगळे काहीही कष्ट घ्यावे लागत नाही. तुम्ही किती फ्रेश दिसताय, तुमचं बोलणं बदललंय याबद्दल तुमच्या आजूबाजूची लोक सांगतात. त्यामुळे आपण स्वत:ला एखादी शिस्त लावून घेतली, तर तुमचं जीवन हे फारच सोप्पं होतं. तुम्ही पार्टी करा, काहीही खा, मज्जा करा. फक्त सकाळी धावायला जा", असेही तेजश्रीने सांगितले. 

दरम्यान तेजश्रीने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत झळकली. यात तिने जान्हवी हे पात्र साकारले होते. तिच्या या पात्राने प्रेक्षकांची मन जिंकली. त्यासोबतच ती 'लेक लाडकी या घरची', 'प्रेम हे', 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतही झळकली. तेजश्रीने मालिकांसोबत अनेक चित्रपटातही काम केले आहे. 'झेंडा', 'लग्न पाहावे करुन', 'शर्यत', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं.