Sai Lokur On Trolling : बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वीच सई लोकूरने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गेल्यावर्षी 17 डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले. गरोदरपणामुळे सईच्या शरीरात प्रचंड बदल झाला आहे. यावरुन सईला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता सईने याबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे.
सई लोकूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सईने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगल्या शब्दात सुनावले आहे. "लोकांना जाड आणि बारीक याच्या पलीकडे काहीच दिसत नाही का?" असा सवाल सईने विचारला आहे. त्यासोबतच तिने नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर पोस्टही लिहिली आहे.
"महिलांना गरोदरपणानंतर स्वत:ची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी साधारणत: 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळते. पण मी बाळ झाल्यानंतर 3 महिन्यातच कामाला सुरुवात केली. एक इन्फ्लुअन्सर म्हणून मी काही उत्पादनांची जाहिरात करणे, त्यासाठी वेळ काढणे, त्या जाहिरातीचे शूटींग करणे या सर्व गोष्टी करत आहे. पण एखादी महिला जी नव्याने आई झाली आहे, तिचे कौतुक करण्याऐवजी लोक तिच्यावर टीका करतात तेही कशावरुन तर वाढलेल्या शरीरावरुन? आणि ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण नक्की कोणत्या समाजात राहत आहोत. एकमेकांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्याऐवजी आपण त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहोत", असे शब्दात सईने सुनावले आहे.
आणखी वाचा : 'मोदी सरकार आलं तेव्हा आनंद झालेला पण 10 वर्षांनी...', किरण मानेंचा घणाघात
सई लोकूरने या पोस्टच्या आधी एका जाहिरातीसोबतचा व्हिडीओही शेअर केला आहे. यावरुनच काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे. यापूर्वीही सईने ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. दरम्यान सध्या सईने कामातून ब्रेक घेतला आहे. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.