मुंबई : अभिनेता उपेंद्र लिमयेने विविध चित्रपटातून आपल्या आवाजाच्या आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. अशीच एक वेगळी भूमिका तो आगामी चित्रपटातून साकारणार आहे. उपेंद्र लिमये त्याच्या आगामी 'सूर सपाटा' या चित्रपटातून एका कबड्डी प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. येत्या २२ मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार असून कबड्डीपटू आणि प्रशिक्षक यांच्यातील 'सूर सपाटा' पाहणं रंजक ठरणार आहे.
कुठल्याही क्षेत्रात दिशादर्शकाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असतं. शिक्षक-प्रशिक्षकांची दूरदृष्टी आणि स्वानुभव मुलांना केवळ योग्य ती दिशाच नाही तर त्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देण्याचं काम करते. अशाच एका कुशल सारथीची भूमिका 'सूर सपाटा'च्या निमित्ताने उपेंद्र लिमये साकारत आहेत. गावखेड्यातील आपल्या मातीतला खेळ म्हणजेच कबड्डीच्या अनुषंगाने या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. त्याचे दिग्दर्शन मंगेश कंठाळे यांनी तर अभिनय जगताप यांनी संगीत दिलं आहे. शाळेतल्या टवाळ मुलांमधील कौशल्य जाणून त्यांना कबड्डी खेळासाठी प्रवृत्त करताना, कधी काट्यावर धरणारे कडक प्रशिक्षक तर कधी मुलांच्या बाजूने उभे राहणाऱ्या प्रेमळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत उपेंद्र लिमये दिसणार आहे.
शिवाय किमान 25 दिग्गज कलाकारांचा ताफा या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार असून त्यांची नावं सध्या गुलदस्त्यात आहेत. जयंत लाडे निर्मित 'सूर सपाटा' या चित्रपटाच्यानिमित्ताने ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंसोबतचा हा रोमांचकारी खेळ प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवणारा आहे.