Onkar Bhojane Birthday : कोकणचा कोहिनूर अशी सर्वत्र ओळख असलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला. या कार्यक्रमामुळे त्याच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. ओंकार भोजनेचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. काही महिन्यांपूर्वी ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. पण हा कार्यक्रम फार काळ चालला नाही. यानंतर ओंकारने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून एक्झिट घेण्याचे खरे कारण सांगितले होते.
आज ओंकार भोजने त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ओंकार हा अनेक चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तो लवकरच कलावती या चित्रपटात झळकणार आहे. यात तो अमृता खानविलकर, संजय जाधव यांच्याबरोबर काम करणार आहे. यानिमित्ताने काही महिन्यांनी ओंकारने एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम का सोडला याबद्दल भाष्य केले होते. तसेच 'फू बाई फू' कार्यक्रमात जाण्याचा निर्णय का घेतला याबद्दलही तो बोलला होता.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम वैगरे सर्व छानच सुरु होतं. पण ते करत असतानाच मला दोन चित्रपटात काम करण्याची संधी आली. माझ्या चित्रपटाच्या शूटींग आणि इतर गोष्टींमुळे त्यांना माझ्यामुळे सतत तडजोड करावी लागत होती. यादरम्यान मलाही ब्रेकची गरज होती. अनेकदा माझी प्रकृती ठीक नसायची. आजही मला त्याची तक्रार जाणवते, म्हणून मी सुट्टी घेतली होती. त्यानंतर मात्र त्या सुट्टीचे रुपांतर कायमस्वरुपासाठी झाले, असे ओंकार भोजने म्हणाला.
मी 'फू बाई फू' या कार्यक्रमात गेलो कारण म्हणजे मला एक फोक प्रकार करायचा होता. हा प्रकार मला हास्यजत्रेत करता आला नव्हता. ती संधी मला त्या कार्यक्रमात मिळाली म्हणून मी तिथे गेलो. विशेष म्हणजे या सगळ्यातून मी खूप शिकलो. सध्या माझं सर्व काही चांगलं सुरु आहे, असेही ओंकारने यावेळी सांगितले.
तसेच मी आता लवकरच चित्रपटात झळकणार आहे. मी एखाद्या चित्रपटात काम करणे ही एक वेगळी बाब आहे. मी एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. मला टेलिव्हिजन म्हणजेच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी प्रेम दिलं. त्यानंतर आता मला मोठ्या पडद्यावरुन प्रेम मिळावं, ही माझी अपेक्षा आहे. आपल्याकडे प्राथमिक माध्यमिक असे टप्पे असतात. माझ्याकडे आताच तो वेळ आहे, त्यामुळे आताच मी ते करु शकतो. त्यानंतर मला ते करता येतील का याची कल्पना नाही. आता माझं ते करण्याचे वय आहे. त्यामुळेच मी ते करतोय, असेही त्याने यावेळी म्हटले.
दरम्यान ओंकार भोजने हा लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे ‘कलावती’ चित्रपटात दिसणार आहे. संजय जाधव हे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत आहेत. तब्बल 4 वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिश दुधाडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे आणि युट्यूबर नील सालेकरही या कलाकारांच्याही भूमिका असणार आहेत.