मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा, आलिया भट्टशी आहे खास कनेक्शन

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मधुबाला यांच्यावर आधारित बायोपिक येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आता त्याची घोषणा करण्यात आली. 

Updated: Mar 15, 2024, 10:01 PM IST
मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा, आलिया भट्टशी आहे खास कनेक्शन title=

Madhubala Biopic Announcement : आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना मोहवून टाकणारी दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेत्री म्हणजे मधुबाला. त्यांच्या निखळ सौंदर्याचे अनेक चाहते होते. आपल्या निरागस अभिनयातून त्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं. अभिनय, सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे त्या आजही सर्वाधिक लोकप्रिय नायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मधुबाला यांच्यावर आधारित बायोपिक येणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आता त्याची घोषणा करण्यात आली. 

बहीण मधुर ब्रीज भूषण असणार चित्रपटाच्या सहनिर्मात्या

मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन हे करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स आणि ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे केली जाणार आहे. याबरोबरच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. नुकतंच सोनी पिक्चर्सतर्फे या चित्रपटाबद्लची घोषणा करण्यात आली आहे. 

पोस्टद्वारे केली घोषणा

सोनी पिक्चर्सने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन, ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मधुबाला व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मधुबाला चित्रपटाची घोषणा, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. तसेच या पोस्टला हटके कॅप्शनही देण्यात आले आहे. "आम्हाला तुम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक उत्कृष्ट आणि मनमोहक कथा बघण्यासाठी सज्ज व्हा", असे या पोस्टला कॅप्शन देण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन करणार आहेत. यापूर्वी जसमीत के रीन यांनी आलिया भट्टची निर्मिती असलेल्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

दरम्यान मधुबाला यांनी जवळपास 60 चित्रपटात काम केले. मधुबाला या त्यांच्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. वीनस ऑफ इंडियन सिनेमा (Venus of Indian cinema) म्हणून त्यांना ओळखले जाते. मधुबाला यांना मिस्टर अँड मिसेस 55, हाफ तिकीट, मुघल-ए-आझम, महल, बादल या चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटात तिने तिच्या निरागस अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.