'माझा शोध चालू आहे...', 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

 'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागात नामांकन जाहीर झाले आहेत.

Updated: Feb 29, 2024, 08:07 PM IST
'माझा शोध चालू आहे...', 'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत title=

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'मन उडू उडू झालं' या मालिकेकडे पाहिले जाते. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू लव्हस्टोरीने सर्वांचीच मनं जिंकून घेतली. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून शर्वरी कुलकर्णीला ओळखले जाते. शर्वरीने या मालिकेत दिपूच्या बहिणीचे पात्र साकारले होते. सध्या शर्वरी ही 'डबल लाईफ', 'जन्मवारी' या नाटकात झळकत आहे. याच नाटकाच्या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

शर्वरी कुलकर्णीला 'झी नाट्य गौरव 2024' या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागात नामांकन जाहीर झाले आहेत. 'जन्मवारी', 'डबल लाईफ' या दोन नाटकासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हे नामांकन जाहीर झाले आहे. तर सर्वोत्कृष्ट वेशभूषा या विभागातही तिला नामांकन मिळाले आहे. याच निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

शर्वरीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागात नामांकन

शर्वरीने या नामांकनाचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबरच तिने तिच्या पोस्टचाही एक फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तिने नाटकाबद्दल तिचं मत काय यावरही भाष्य केले.

"कलाकार नावाचे लबाड गोड चोर नकळत एकमेकांकडून बरंच चांगलं काही घेत असतात आणि देतही असतात. एखादं पात्र-character साकारण्याचं धाडस येतं कुठून आपल्यात? अपूर्णत्वातून येत असावं. आपण ना कलाकार म्हणून परिपूर्ण असतो, ना माणूस म्हणून परिपूर्ण असतो. म्हणूनच कायम एक शोध चालू असतो, आपल्या आत. नाटक शिकवतं मला हा शोध घ्यायला. नाटक म्हणजे मला प्रयोगशाळा वाटते. माणूस म्हणून तुम्ही आणि लेखकाने लिहिलेलं पात्र मिसळल्यावर तयार होतं एक वेगळंच रसायन. वेगळीच व्यक्ती म्हणून आपण स्टेजवर वावरतो काय, लेखकाची वाक्य आपलीच समजून बोलतो काय, वेगळ्याच माणसांचे कपडे घालून स्टेजवर एकमेकांना फसवतो काय! परत-परत पुन्हा-पुन्हा तेच-तेच, पण नकळत घेतलेल्या श्वासाइतकं आणि आवंढ्याइतकं उत्स्फूर्त आणि जिवंत अशा प्रयोगांची शाळा, म्हणजे नाटक. माझा शोध चालू आहे", असे शर्वरीने म्हटले आहे. 

शर्वरीच्या या पोस्टवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी "मस्त लिहिलं आहेस", अशी कमेंट केली आहे. तर आशुतोष गोखले यांनी "सुंदर, खरं लिहिलंस, अभिनंदन आणि शुभेच्छा" अशी कमेंट केली आहे. तसेच रसिका वेंगुर्लेकर यांनी "खूप छान लिहिलंस गं", अशीही प्रतिक्रिया दिली आहे. शर्वरी कुलकर्णीने झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती सोनी मराठीवरील 'आनंदी हे जग सारे' या मालिकेत झळकली. तसेच तिने रंगभूमीवरही काम केले आहे. शर्वरी 'जन्मवारी', 'डबल लाईफ' या दोन मराठी नाटकात सध्या झळकत आहे.