प्रिया वारियरच्या नजरेने आणखी एक विकेट, पण....

प्रसिद्धीचे निकष बदलत नव्या संकल्पनांच्या बळावर २०१८ या वर्षात अनेक चेहरे प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रिया वारियर. 

Updated: Dec 13, 2018, 10:46 AM IST
प्रिया वारियरच्या नजरेने आणखी एक विकेट, पण....  title=

मुंबई  : खरंतर हल्लीच्या काळात प्रसिद्ध होण्यासाठी अमुक एका कारणाची गरज नाही, हे सिद्ध करणारी बरीच उदाहरणं आपल्या समोर आहेत. मुख्य म्हणजे प्रसिद्धीचे निकष बदलत नव्या संकल्पनांच्या बळावर २०१८ या वर्षात अनेक चेहरे प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रिया वारियर. 

'ओरु अदार लव्ह' या मल्याळम चित्रपटातील 'माणिक्य मलरया पूवी' या गाण्याचा एक व्हिडिओ या वर्षाच्या सुरुवातीला व्हायरल झाला. याच व्हिडिओमधून अवघ्या काही क्षणांसाठी प्रियाच्या अदा पाहायला मिळाल्या होत्या. तिच्या नजरेच्या एकाच बाणाने प्रेक्षक असे काही घायाळ झाले की पाहता पाहता 'सोशल मीडिया सेंसेशन' म्हणून ती ओळखली जाऊ लागली. 

'गुगल इंडिया'ने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत प्रिया ही २०१८ या वर्षात भारतात सर्वाधिक सर्च केली गेलेली व्यक्ती ठरत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनीच प्रियावरील प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली. तिच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. अवघ्या काही तासांमध्ये प्रिया, 'नॅशनल क्रश' म्हणूनही ओळखली जाऊ लागली होती, परिणामी तिच्याविषयी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा तिने नजरेने आणखी एक विकेच घेतली आहे. पण, काहीशी वेगळ्या पद्धतीने असं म्हणायला हरकत नाही. 

तिच्यामागोमाग 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास याच्याविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरऱ्यांनी गुगलची मदत घेतली. प्रियांका चोप्रा हिचाही या यादीत समावेश असून ती यात, चौथ्या स्थानावर आहे.  

प्रिया वारियर हिच्या वाट्याला आलेल्या प्रसिद्धीविषयी सांगावं तर फक्त मल्याळमच नव्हे, तर सर्व भाषिय कलाविश्वात आणि प्रेक्षकांमध्ये तिच्या नावाची किंबहुना तिच्या नजरेची जादू पाहायला मिळाली. पाहता पाहता प्रियाच्या सोशल मीडिया आकाऊंटवर फॉलोअर्सचा आकडाही झपाट्याने वाढला. रातोरात प्रसिद्धीझोतात येणं, किंवा आयुष्याला अचानक अनपेक्षित कलाटणी मिळणं म्हणजे नेमकं काय असतं याचच उदाहरण म्हणजे प्रिया वारियर.