महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन

META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.

Updated: Mar 13, 2023, 11:00 PM IST
महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023

Mahindra Excellence in Theatre Awards: महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्कार हा भारताच्या नाट्य चळवळीतील अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे (Mahindra Excellence in Theatre Awards (META) ) 23 ते 29 मार्च या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे. ही नाटके दिल्ली येथे होणाऱ्या एका दिमाखदार कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. या नाटकांनंतर एका रेड कार्पेट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार जिंकणाऱ्यांचा 29 मार्च रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नाट्यक्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. 

10 सर्वोत्कृष्ट नाटकांमध्ये मराठी विभागातून  भूषण कोरगांवकर दिग्दर्शित  आणि 'बी स्पॉट' निर्मित लावणी के रंग आणि व्हाया सावरगाव खुर्द हे सुयोग देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेले आणि आसक्त कलामंच यांनी निर्मित केलेले नाटक नामांकीत करण्यात आले आहे.  लावणी के रंग हे नाटक 1 तास आणि 30 मिनिटांचे आहे तर व्हाया सावरगाव खुर्द  1 तास 36  मिनिटांचे आहे. 

यंदाच्या वर्षी या नाट्यमहोत्सवासाठी 395 नाटकांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, तमिळनाडू, आसाम,मणिपूर आणि राजस्थानमधील नाट्यकंपन्यांनी आपली नाटके या नाट्यमहोत्सवासाठी पाठवली होती.  विविध विभागातून जी 10 नाटके नामांकीत करण्यात आली आहे त्यात आसामी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, मारवाडी आणि तमिळ भाषेतील नाटकांचाही समावेश आहे. 

नाट्यपुरस्कारांसाठीच्या निवड समितीने नामांकने जाहीर करण्यापूर्वी एकूण 395 नाटके पाहिली. या समितीमध्ये लेखक आणि सीगल बुक्सचे माजी मुख्य संपादक अंजुम कात्याल, अभिनेते, दिग्दर्शक केवल अरोरा,प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी नाट्य दिग्दर्शक शंकर वेंकटेश्वरन आणि नाट्यसमीक्षक विक्रम फुकान यांचा समावेश होता. 

नीना कुलकर्णी यांनी या नाट्यपुरस्काराबाबत बोलताना म्हटले की  या स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि खासकरून ईशान्येकडील राज्यातून नाटके आली होती. विशेष उल्लेख करून सांगायचे झाले तर आसाम, मणिपूर आणि ओडिशातून ही नाटके आली होती. ही नाटके पाहणं आनंददायी वाटले.  आपल्या देशातील नाटके ही देशाप्रमाणेच वैविध्यतापूर्ण आहेत.यावर्षी या नाट्यमहोत्सवाचे उद्दीष्ट्य हे देशाची वैविध्यता आणि समावेशकता दाखवणे हे होते.  त्यामुळे विविध राज्यांतून आलेली नाटके पाहताना छान वाटत होते. ऐतिहासिक, पौराणिक, प्रयोगात्मक, महिला सक्षमीकरण, विनोदी धाटणीची नाटके पाहायला मिळाली.

महिंद्रा आणि महिंद्राचे उपाध्यक्ष जय शहा यांनी मेटा 2023 बाबत बोलताना म्हटले की,  “महिंद्रा समूहाने वैविध्यता आणि सर्वसमावेशकता हे उद्दीष्ट्य कायम डोळ्यासमोर ठेवले आहे.  आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की, निवड समितीने गेले 4 दिवस नाटके पाहून विविध विभागातून 10 नाटकांसाठी नामांकने दिली."  

नामांकन मिळालेल्या नाटकांची नावे पाहण्यासाठी www.metawards.com या संकेतस्थळाला भेट द्या. वेबसाईटवर आपल्याला संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि  नाट्यपुरस्कारांसाठीचे ज्युरी यांची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.