महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा प्रोमो वादात, महिला आयोगाकडून का होतोय जोरदार आक्षेप

सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाला सुरूवात 

Updated: Jan 13, 2022, 02:11 PM IST
महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचा प्रोमो वादात, महिला आयोगाकडून का होतोय जोरदार आक्षेप title=

मुंबई : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरण भात लोंच्या, कोणी नाय कोणचा' हा चित्रपट 14 जानेवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे.  मात्र त्याआधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. त्यातील सिन विकृत तसेच आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारी येत आहेत.

चित्रपटात लहान मुलांच्या तोंडी घाणेरड्या शिव्यांचा सर्रास वापर आहे.  विशेष म्हणजे त्यातून स्त्रियांची अवहेलना दिसून येत आहे. याबाबत पुण्यातील क्रिएटिव्ह फाऊंडेशनने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना त्यांनी याबाबत खुलासा सादर करायला सांगितलं आहे. 
 

 यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाच निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना जाणून घेण्यासाठी आयोगाकडून लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकार यांनी दिली. याप्रकरणी लेखी स्वरूपातील खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार आयोगास तात्काळ पाठविण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.