ऍक्शन रिप्ले! अखेर महाराष्ट्रात चित्रीकरणाला हिरवा कंदील

दोन महिन्यांनंतर चित्रीकरणाला सुरूवात होणार.     

Updated: Jun 1, 2020, 01:41 PM IST
ऍक्शन रिप्ले! अखेर महाराष्ट्रात चित्रीकरणाला हिरवा कंदील  title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपट, मालिका, वेब सीरिजच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली होती. अखेर दोन महिन्यांनंतर महाराष्ट्रात चित्रीकरणाला हिरवा कंदील  दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार सेटवर योग्य ती काळजी घेत चित्रीकरणाला सुरूवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक त्याचप्रमाणे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात ठप्प पडलेल्या मनोरंजन क्षेत्राच्या कामकाजाला उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या ब्रॉडकास्टर्स आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत संवाद साधला होता.

परंतु कोणत्याही भागात चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी सरकारने लादण्यात आलेल्या अटी शर्तीचे पालन करण्याचे आवाहन  प्रॉडक्शन हाऊसला करण्यात आले आहे. एखाद्या शहरात चित्रीकरण करायचे राहिल्यास तेथील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असणार आहे. शिवाय फिल्म सिटीमध्ये शुटींगमध्ये करायचे राहिल्यास महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळची परवनगी असणं गरजेचं असणार आहे. 

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. मार्च महिन्यापासून अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रिकरणही बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.