मुंबई : नेटफ्लिक्सनं आपला तिसरा भारतीय सिनेमा 'लस्ट स्टोरी'चा ट्रेलर प्रदर्शित केलाय. या सिनेमात चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या कहाण्या एकत्रित दिसणार आहेत. यामध्ये, करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित चार कहाण्यांचा समावेश आहे. यामध्ये राधिका आपटे, आकाश ठोसर, भूमी पेडणेकर, विक्की कौशल, कियारा आडवानी, मनीषा कोयराला, संजय कपूर यांसारखे कलाकार दिसणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 'सैराट'फेम आकाश ठोसर याचा हा पहिलाच हिंदी सिनेमा ठरणार आहे... या सिनेमातील आकाशचा लूकही प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरतोय.
या कहाण्यांमध्ये राधिका एका महाविद्यालयीन प्रोफेसरच्या भूमिकेत दिसतेय... ही कथा अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलीय.
तर भूमी पेडणेकर एका नोकरानीच्या भूमिकेत आहे... ती आपल्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडलीय... ही कथा झोया अख्तर हिनं दिग्दर्शित केलीय.
तर करण जोहर दिग्दर्शित कथेत कियारा आडवानी, विक्की कौशल आणि नेहा धुपिया दिसतात.
चौथ्या कथेचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केलंय... या कथेत मनीषा कोईराला, संजय कपूर आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या सर्व कथांना जोडणारा धागा म्हणजे प्रेम आणि विविध नाती... या सर्व दिग्दर्शकांनी पाच वर्षांपूर्वी शॉर्ट फिम्ससाठी हातमिळवणी केली होती. 'बॉम्बे टॉकीज' (२०१३) मध्ये याच चार दिग्दर्शकांच्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या सिनेमाला टीकाकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता... पण, बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा फोल ठरला.