मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'हे' मराठी कलाकार लढणार?

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक पाहता हे मराठमोळे कलाकार करु शकतात शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण...

दिक्षा पाटील | Updated: Apr 5, 2024, 02:16 PM IST
मुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'हे' मराठी कलाकार लढणार? title=
(Photo Credit : Social Media)

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक पाहता सगळेच पक्ष हे त्यांच्या त्यांच्या पक्षातील जो उमेदवार त्यांना पात्र वाटतोय त्यांच्या नावांची घोषणा करत आहेत. एकीकडे बॉलिवूड अभिनेता गोविंदानं 28 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचा प्रचार करण्यास असल्याची घोषणा केली. तर आता शिवसेनेत आणखी काही कलाकार पाहता येण्याची शक्यता आहे. आता शिंदे गटातून कोणते मराठमोळे कलाकार समोर येणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असताना. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काही मराठी कलाकारांची नावं समोर येत आहेत. 

मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस नेता संजय निरुपम यांच्या विरोधानंतरही अमोल कीर्तिकरांची उमेदवारी ही तशीच ठेवली. हे पाहता अशी चर्चा सुरु आहे की एकनाथ शिंदे हे यावेळी मराठी कलाकारांना घेऊ इच्छित आहेत. मुंबईतील उत्तर-पश्चिम उमेदवारीसाठी अभिनेता शरद पोंक्षे, सचिन पिळगांवकर आणि सचिन खेडेकर या कलाकारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता नक्की ही जागा कोणासाठी असेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. लक्षवेधी गोष्ट म्हणजे संजय निरुपम यांनी काल कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याशिवाय त्यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे संजय निरुपम हे शिंदेगटात प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा सुरु आहे. 

हेही वाचा : 'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा

रिपोर्ट्सनुसार, या भागात मराठी की अमराठी कोणाला जास्त पाठिंबा मिळू शकतो याचं सर्वेक्षण शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, निरुपम हा अमराठी चेहरा असल्यानं भाजप स्थानिक नेत्यांकडून काही चांगला कौल मिळत नसल्याचं म्हटलं जातं आहे. तर काही जागांवर अजुनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला? 

या सगळ्यात पहिलं नाव हे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचं आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदार संघातून तिकिट मिळालं आहे. तिच्या मागोमग रामायण या लोकप्रिय ठरलेल्या रामानंद सागर यांच्या मालिकेत श्रीराम ही भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना भाजपकडून मेरठचं तिकिट देण्यात आलं आहे.