मुंबई : दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव जरी उच्चारलं तरी या अभिनेत्याचे चित्रपट डोळ्यासमोर येतात... याच अभिनेत्याचा शालेय जीवनापासून सुपरस्टार पदापर्यंतचा प्रवास आता उलगडणार आहे तो रंगमंचावर... 'लक्षातला लक्ष्या' या नाटकाद्वारे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे चाहत्यांना पुन्हा एकदा रंगमंचावर अनुभवायला मिळणार आहे. पुरूषोत्तम बेर्डे या नाटकाची निर्मिती आणि लेखनाची धुरा सांभाळतायत... तर विजय केंकरे या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत. पुरूषोत्तम बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यातला संवाद एका हटके पद्धतीने यातून मांडण्यात येणार आहे.
३ नोव्हेंबर १९५४ रोजी जन्मलेल्या लक्ष्यानं विनोदी कलाकार म्हणून ओळख मिळवली तरी ते एक संवेदनशील अभिनेते होते. 'अशी ही बनवा बनवी'पासून ते अगदी 'एक होता विदुषक' अशा सिनेमांत बहुरंगी आणि बहुढंगी रुपातून लक्ष्या प्रेक्षकांसमोर आला... 'हमाल दे धमाल' सिनेमानंतर तो त्यावेळी मराठी कष्टकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनला. रंगभूमी, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही लक्ष्यानं आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला. १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.