जेव्हा पुरुषप्रधान कपूर घराण्यात करिश्माने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय, काय होती कुटुंबाची प्रतिक्रिया; करिनाने केला खुलासा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबाने एकीकडे पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर असे एकापेक्षा एक अभिनेते बॉलिवूडला दिले असताना करिश्मा ही पहिली मुलगी होती जिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तोपर्यंत कपूर कुटुंबातील कोणतीही महिला चित्रपटांमध्ये काम करत नव्हती.   

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2024, 07:35 PM IST
जेव्हा पुरुषप्रधान कपूर घराण्यात करिश्माने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय, काय होती कुटुंबाची प्रतिक्रिया; करिनाने केला खुलासा title=

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबाने पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर, रणबीर कपूर असे एकापेक्षा एक अभिनेते, दिग्दर्शक बॉलिवूडला दिले आहेत. पण एक काळ असा  होता जेव्हा कपूर कुटुंबातील फक्त पुरुषच बॉलिवूडमध्ये सक्रीय होते. बबिता आणि नितू कपूर यांनीही लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं होतं. पण अखेर ही प्रथा मोडण्याचं काम करिश्माने केलं आणि कपूर कुटुंबातील पहिली अभिनेत्री ठरली. करिश्मा कपूर कुटुंबातील पहिली मुलगी होती जिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. कपूर कुटुंबाशी बंड करत तिने हे पाऊल उचललं अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. पण आता करिश्माची बहिण करिनाने एका मुलाखतीत करिश्माच्या या निर्णयावर कुटुंबाची काय प्रतिक्रिया होतीयाचा खुलासा केला आहे. 

The Week ला दिलेल्या मुलाखतीत करिनाने सांगितलं की, जेव्हा करिश्माने अभिनयक्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाने तिला पूर्ण समर्थन दिलं होतं. ती म्हणाली, "माझ्या आईने माझ्या बहिणीला खूप पाठिंबा दिला होता. ती म्हणाली होती 'तुला जे करायचं आहे ते तू करावं अशी माझी इच्छा आहे. लोकांना त्यावेळी माझे वडील विरोध करतील असं वाटलं होतं. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी माझे वडील तिला म्हणाले, 'जर तुम्हाला हे करायचे असेल, तर तू स्वतः प्रयत्न कर. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही'.

करिनाने सांगितलं की, माझे वडील त्यावेळी (1990) काम करत नव्हते आणि त्यांनी करिश्माला तुलाच काय करायचं ते करावं लागेल असं म्हटलं होतं. "तुला इतका मोठा वारसा लाभला आहे म्हणून तू 100 टक्के मोठी स्टार होणार असं नाही. किंवा मी तुला मोठी अभिनेत्री होण्यात, चित्रपट मिळवून देण्यात मदत करेन असंही नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी आम्हाला स्वत:च्या हिंमतीवर करण्याचं बळ दिलं," असं ती म्हणाली.

याच मुलाखतीने करिनाने करिश्माने एकाप्रकारे अभिनय करण्याचा निर्णय घेत कुटुंबाला पुनर्जन्म दिला असं सांगितला. "माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. माझ्या वडिलांनी एक चित्रपट तयार केला होता. चिंटू अंकल सुपरस्टार होते. पण याव्यतिरिक्त कुटुंबातील कोणीही काम करत नव्हतं. त्यामुळे करिश्मा पहिली महिला कपूर होत जी स्टार झाली," असं करिना म्हणाली.

करिश्माने 1991 मध्ये 'प्रेम कैदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी ती 17 वर्षांची होती. त्यानंतर तिने 'अनारी', 'कुली नंबर 1' आणि 'राजा हिंदुस्तानी' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 2024 मधील 'मर्डर मुबारक' चित्रपटात ती अखेरची दिसली होती.