Krushna Abhishek-Govinda Dispute : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातो. कृष्णा अभिषेक हा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. गोविंदा आणि कृष्णा यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. या मतभेदामुळे ते दोघेही कित्येक वर्ष एकमेकांच्या समोरही आलेले नाहीत. गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले आहे. गोविंदा यांची पत्नी सुनितानेही यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता कृष्णा अभिषेकने गोविंदा यांच्यासोबतचा वाद संपवायचा असल्याचे सांगितले आहे.
कृष्णा अभिषेकची बहिण अभिनेत्री आरती सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आरती सिंह ही बिग बॉस 13 या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ती लवकरच बॉयफ्रेंड दीपक चौहानसोबत लग्न करणार आहे. या लग्नसोहळ्याला मामा गोविंदा हजेरी लावणार का? याबद्दल कृष्णाने वक्तव्य केले आहे. कृष्णाने नुकतंच 'नवभारत टाईम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याचा मामा गोविंदा यांच्याबद्दलच्या मतभेदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने मनमोकळेपणाने उत्तर दिले.
"मला मामा गोविंदासोबत असलेले मतभेद आता संपवायचे आहेत, जेणेकरुन माझे आणि मामाचे नाते पुन्हा बहरेल. मी त्यांचा खूप आदर आणि सन्मान करतो. आमचे कुटुंब पुन्हा एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. मी छोट्या पडद्यावर कॉमेडी शो करुन इतकी प्रसिद्धी मिळवली आहे आणि माझे मामा गोविंदा कॉमेडीचे बादशाह म्हणून ओळखले जातात. जर आम्ही एकत्र आलो, तर काय होईल, याचा तुम्ही विचार करा. जर आम्ही दोघे एकत्र येऊन एखादा कार्यक्रम किंवा डान्स केला तर लोकांना किती मज्जा येईल. त्यामुळेच आम्ही दोघं एकत्र यावं, असं मला वाटतं", असे कृष्णा अभिषेकने म्हटले.
कृष्णानं 2015 साली एक मुलाखत दिली होती. “माझ्या मामानं मला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कुठलीही मदत केली नाही. मी स्वत: संघर्ष करुन माझं स्थान निर्माण केलं आहे” असं कृष्णा या मुलाखतीत म्हणाला होता. त्याचं हे वक्तव्य गोविंदाला अजिबात आवडलं नाही. “लोक केलेले उपकार इतक्या लवकर विसरतात.” असं म्हणत गोविंदाने कृष्णाला प्रत्युत्तर दिलं होतं.
यानंतर कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने 3 वर्षांपूर्वी एक ट्वीट केले होते. यात तिने ‘काही लोक पैशासाठी नाचत होते’ असे म्हटले होते. सुनीता यांना वाटले की हे ट्वीट पती गोविंदासाठी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. यावेळी सुनीता म्हणाल्या की, "गेल्या ३ वर्षात वाद इतका वाढला आहे की आता त्याला विसरण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. असे कधीच होणार नाही. ३ वर्षांपूर्वी मी म्हणाले की मी जिवंत असताना हे संपणार नाही. कुटुंबाच्या नावाने, आपण गैरवर्तन करू शकत नाही किंवा चुकीचा फायदा घेऊ शकत नाही. आम्ही लहानाचे मोठे केले म्हणून तुम्ही आता डोक्यावर बसू शकत नाही. माझ्या सासूबाईंचे निधन झाल्यानंतर आम्ही कृष्णाला घर सोडायला सांगितले असते तर? ज्यांनी त्याला लहानाचे मोठे केले आहे, तो त्यांचा अपमान करत आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा वाद कधीच संपणार नाही. मला त्याचा चेहरा पुन्हा कधीच पाहायचा नाही." तेव्हापासून आतापर्यंत गोविंदा आणि कृष्णा यांनी एकमेकांसोबत संभाषण केलेलं नाही.