Kannada Superstar Darshan: कन्नड़ सुपरस्टार दर्शन गेल्या अनेक महिन्यांपासून हत्येप्रकरणी जेलमध्ये बंद आहे. दर्शनने रेणुकास्वामी या चाहत्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. दरम्यान आपल्याला जेलमध्ये रेणुकास्वामीची आत्मा सतावत आहे असा दावा दर्शन करत आहे. बल्लारी जेलमधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दर्शनच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दर्शनच्या वकिलांनी सांगितलं आहे की, जर न्यायलयीन कोठडी वाढवण्यात आली तर अभिनेता अधिकाऱ्यांकडे त्याला पुन्हा बंगळुरुच्या जेलमध्ये पाठवण्यात यावं अशी मागणी करणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुपरस्टार दर्शनने तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्याला एका जवळच्या चाहत्याच्या हत्येची भीती वाटत आहे. त्याने तक्रार केली आहे की, रेणुकास्वीमीची आत्मा त्याच्या स्वप्नात येऊन त्रास देत आहे. या समस्येमुळे आपण खूप त्रस्त आहोत, कारण आपण सेलमध्ये एकटेच राहतो. भीतीमुळे नीट झोपू शकत नाही म्हणून या परिस्थितीचा सामना करणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे, असंही दर्शनने अधिकाऱ्यांना सांगितले. कारागृहातील सूत्रांनीही याप्रकरणी अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
इतकंच नाही तर पहाटे दर्शनाच्या किंकाळ्या ऐकल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनाची पत्नी विजयालक्ष्मीनेही त्याच्यासाठी मंदिरात पूजा केली आणि या घटनेनंतर त्याच्यासाठी विशेष प्रार्थनाही केली. दर्शनला त्याच्या मित्रांसह बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तिथे त्याला व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचे फोटो समोर आल्यानंतर त्याला वेगळ्या कारागृहात हलवण्यात आलं. आता तो बेल्लारी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिथे चाहते रेणुकास्वामीच्या आत्म्यामुळे आपण त्रस्त असल्याचा दावा तो करत आहे.
बेल्लारी जेलमधील अधिकाऱ्यांनी कोणतीही जोखीम न घेता त्याला एका छोट्या कोठडीत वेगळे ठेवलं आहे. तिथे तो कोणालाही भेटू शकत नाही. अधिकाऱ्यांनी त्याची सुविधा देण्याची मागणी फेटाळून लावली असून न्यायालयाच्या सूचनेनंतरच त्याला सुविधा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. दर्शनच्या मुलाने नुकतीच आई विजयालक्ष्मीसह त्याची तुरुंगात भेट घेतली होती. दरम्यान, त्याच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी कोर्टात सुनावणी होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने पाठदुखीची तक्रार केली आहे, एका ऑर्थोपेडिक सर्जनने बेल्लारी तुरुंगात त्याची तपासणी केली, आणि स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. दर्शनने तुरुंग प्रशासनाला विनंती केली आहे की, त्याला योग्य उपचारांसाठी बंगळुरू तुरुंगात परत पाठवावे. त्याचे वकील यासंदर्भात कोर्टात युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.