कनिका कपूरवर कारवाईचा बडगा? योगी सरकारने दिले 'हे' आदेश

कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहीती लपल्याचा आरोप तिच्यावर होतोय.

Updated: Mar 21, 2020, 07:15 AM IST
कनिका कपूरवर कारवाईचा बडगा? योगी सरकारने दिले 'हे' आदेश title=

नवी दिल्ली : बॉलिवुडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरवर कोरोना असल्याची माहिती लपवल्याचा आरोप होत असून तिला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्री लखनऊच्या सरोजनी नगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहीती लपल्याचा आरोप तिच्यावर होतोय. उत्तर प्रदेश सरकारने ती उपस्थित असलेल्या सर्व पार्ट्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्ट्यांमध्ये कोण उपस्थित होते ? या पार्ट्या कुठे झाल्या ? याचा अहवाल २४ तासात प्रमुख गृह सचिवांना देण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. 

कनिका कपूरचे कोरोना प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मोठे निर्णय घेतले. उत्तर प्रदेशमध्ये सर्व मॉल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लखनऊमध्ये सरोजनी नगर उपजिल्हाधिकारी प्रफुल्ल कुमार त्रिपाठी यांनी खाण्यापिण्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. छोट्या-मोठ्या सर्वच दुकानदारांना कोरोनाशी लढण्यात साथ देण्याचे आवाहन केले आहे. 

कनिका लखनऊमध्ये ती ३-४ पार्ट्यांमध्ये होती. कानपूर देखील गेली. दरम्यान तीनशे ते चारशे जणांच्या संपर्कात आली. लखनऊ ती ज्या पार्टीत होती ती राजकीय पार्टी होती. यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, त्यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह तसेच उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह देखील होते. अनेक नेत्यांचे कुटुंब देखील इथे होते. 

आता वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. पण कोरोनाची ही साखळी बनत चालली आहे.

कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांसहित शेकडो व्यक्ती पार्टीला गेल्या नसत्या आणि त्यांनी समजदारी दाखवली असती, स्वत: पार्टीला न जाता इतरांनाही यापासून रोखले असते. तर आज लखनऊ पासून संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत भीतीचे सावट पोहोचले नसते. 

आता कनिकाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्या पार्टीमध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि त्यांची मेडिकल कंडिशन काय आहे, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. सेलिब्रिटी व्यक्तीने का खबदारी घेतली नाही? तसेच लंडनवरुन परतल्यानंतर तिची तपासणी झाली होती का, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

तिने काय म्हटले आहे पोस्टमध्ये ?

सर्वांना नमस्कार, गेल्या चार दिवसांपासून मला फ्लूची लक्षणे दिसून आली आहेत, माझी स्वतःची चाचणी घेतली गेली आणि ती कोविड -१९ positive आहे. मी आणि माझे कुटुंबीय आता पूर्णपणे अलग  आहोत आणि पुढे कसे जायचे या वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरन करीत आहोत. मी ज्या लोकांच्या संपर्कात आहे त्यांचे संपर्क मॅपिंग तसेच सुरू आहे. १० दिवसांपूर्वी जेव्हा मी घरी परतले, तेव्हा सामान्य प्रक्रियेनुसार मला विमानतळावर स्कॅन केले गेले. पण तसे काही दिसून आले नाही. मी नॉर्मल असल्याचे दिसून आले.