मुंबई : मराठी सिनेमे आता बॉलिवूडकरांना खुणावत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. प्रियंका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार पाठीपोठ आता आणखी एक बॉलिवूड अभिनेता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. या कलाकाराचं नाव आहे जॉन अब्राहम.
बॉलिवूडमध्ये 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने सिनेमा निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. दमदार कथानकांच्या सिनेमांना प्राधान्य देत जॉनने आजवर त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत ‘मद्रास कॅफे’ (2013), ‘रॉकी हॅण्डसम’ (2016) आणि ‘फोर्स 2’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. वेगळ्या कथानकांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉन आता मराठी सिनेसृष्टीकडेही वळला आहे.
‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची तो निर्मिती करत आहे. नुकतेच या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करुन सिनेमाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. या सिनेमांत सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. जॉनची निर्मिती असलेला त्याचा पहिलावहिला मराठी सिनेमा यावर्षी 31 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘फुगे’ या सिनेमाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांनी ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
रंगभूमीवरील गाजलेल्या "सविता दामोदर परांजपे' या नाटकावर जॉनचा हा सिनेमा आधारित आहे. या नाटकाची कथा त्याला इतकी आवडली होती की त्यावर त्याने लगेच सिनेमा करायचे, असे ठरवूनच टाकले होते. नाटकात दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची प्रमुख भूमिका होती.