Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा

Siddharth Chandekar Mother : Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा   

सायली पाटील | Updated: Aug 23, 2023, 09:02 AM IST
Happy Second Innings आई!, म्हणत सिद्धार्थ चांदेकरकडून आईला दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा  title=
jhimma fame actor Siddharth Chandekars mother gets maried for second time

Siddharth Chandekar Mother : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी, अभिनेत्री मिताली मयेकर त्यांच्या सहलींपासून कामापर्यंत आणि अगदी घरापासून स्वयंपाकघरापर्यंतचे अनेक व्हिडीओ, फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अशा या जोडीच्या जीवनात एक नवं वळण आलं आहे. हे वळण त्यांचं आयुष्य बदलणार आहे, कारण सिद्धार्थ - मितालीच्या कुटुंबात एका नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे.

सोशल मीडियावरूनच खुद्द सिद्धार्थनं या व्यक्तीची ओळख करून दिली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्याच्या आईचं म्हणजेच सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न. आयुष्याच्या वळणावर अनेकदा आपल्याला जोडीदाराचं महत्त्वं कळतं कारण, त्यांचं असणंच आपल्याला आधार देऊन जातं. आईसाठीही ही जाणीव महत्वाची असल्याचं म्हणत सिद्धार्थनं तिला आधार देत एका नव्या प्रवासाच्या शुभेच्छाही दिल्या. आईच्या लग्नातील फोटो शेअर करत त्यानं यावर एक कॅप्शनही दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

कॅप्शनमध्ये सिद्धार्थनं लिहिलंय...

'Happy Second Innings आई!
तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!
I love you आई!'

#उत्तरार्ध असं लिहित सिद्धार्थनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या आईनं लाल रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या शेजारी असणाऱ्या त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावरही कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. काही क्षण खूप काही बोलून जातात. सिद्धार्थ, मिताली, सीमा चांदेकर आणि त्यांच्या पतीसाठी हा तोच क्षण असावा.

हेसुद्धा वाचा : वनिता खरातसाठी सासूबाईंनी केला खास बेत, केले सूनचे खूप लाड; पाहा Photo

सिद्धार्थचे हे शब्द पाहून त्याला झालेला आनंद आणि मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त होत आहेत. त्यानं हा फोटो शेअर करताक्षणीच त्यावर त्याच्या कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात सुरुवात केली. जीवनाच्या या टप्प्यावर एका नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या त्याच्या आईसाठी आणि सिद्धार्थसाठीही या शुभेच्छा नक्कीच सुखावणाऱ्या असतील.