मुंबई : 'जय मल्हार' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला देवदत्त नागे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जय मल्हार या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात तो भूमिका साकारत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तची झलकही पाहायला मिळते.
या सिनेमात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेत त्याने साकारलेल्या खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे त्याला फार प्रसिद्धी मिळाली आणि बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण करावं अशी त्याच्या चाहत्यांचीही इच्छा होती. अखेर जॉनच्या या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत आहे.
देवदत्तने साकारलेली खंडोबाची व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध आहे. या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरात पोहोचला आणि या प्रसिद्धीची प्रचिती त्याला शूटिंगदरम्यानसुद्धा आली. यासंदर्भातील एक किस्सा त्याने सांगितला. ‘शूटिंग पाहण्यासाठी आलेले लोक चक्क सेटवर देवदत्तच्या पाया पडायचे आणि हे पाहून जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक सुद्धा चक्रावून जायचे. मी साकारलेल्या खंडोबाच्या भूमिकेचा प्रभाव लोकांवर इतका आहे की ते साक्षात देवच समजून पाया पडायला यायचे.
इतकंच नाही तर या चित्रपटात मी खलनायकाची भूमिका साकारत आहे आणि जॉन एका महिलेला मला कानाखाली मारण्यास सांगत असतो असं दृश्य त्यात आहे. ती महिलासुद्धा माझ्या खंडोबाच्या भूमिकेनं इतकी प्रभावित झाली होती की मला मारण्यासच तयार होत नव्हती. अखेर मी तिला समजावून सांगितलं. तू कलाकार नाही तर मी साकारणाऱ्या भूमिकेचा विचार कर आणि अभिनय कर असा सल्ला मी तिला दिला. बराच वेळ तिला समजावून सांगितल्यानंतर तो सीन करण्यास ती तयार झाली,’ असं तो म्हणाला. सहकलाकार जॉनसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत अनोखा असून आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच आहेत, असंदेखील तो म्हणतो. हा सिनेमा 15 ऑगस्टरोजी प्रदर्शित होत आहे.