Jai Bhim Review : अन्याय झाल्यावर मदतीला येतो तो 'जय भीम'

‘जय भीम’ पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचाच

Updated: Nov 13, 2021, 09:37 AM IST
Jai Bhim Review : अन्याय झाल्यावर मदतीला येतो तो 'जय भीम' title=

मागच्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता सूर्या त्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला होता. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, आणि मग काय सुरुवात झाली न थांबणाऱ्या चर्चांना, वादविवादांना आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकर्षानं बोलण्याला. चित्रपटाची सुरुवातच विचलीत करणाऱ्या दृश्यानं होते.

तिथे काही आदिवासींना पोलीस स्थानकात बसवण्यात आलं आहे. त्यांनी न केलल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना दिली जात असल्याचं सुरुवातीच्याच दृश्यात दाखवण्यात आलं आहे. इरुला आदिवासींचा एक समूह श्रीमंत आणि जमीनदारांच्या शेतांची राखण करत असतात. हा समूह साप पकडण्यामध्ये तरबेज असतो. पण, या आदिवासी समूहाची परिस्थिती मात्र हलाखीचीच.

चित्रपट : जय भीम (Jai Bhim)

कलाकार : सूर्या (Suriya), लिजो मोल जोस (Lijo Mol Jose), प्रकाश राज (Prakash Raj), मणिकंदन(Manikandan)

दिग्दर्शन : टीएस गनानवेल 

कुठे पाहाल? : ऍमेझॉन प्राइम वीडियो (Amazon Prime Video)

चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकानं आदिवासी समुदायाची एक निरागस बाजू अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. चित्रपटातील सर्व पात्र प्रत्येक दृश्याच्या वेळी लक्ष वेधतात. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात न्यायालयातील कामकाज आणि तेथील वातावरणाचा वापर सुरेख करण्यात आला आहे.

मनिकंदन आणि लिजो मोल जोस यांनी आदिवासी जोडप्याची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. तर, अभिनेता सूर्या याच्या अभिनयावरुन काही केल्या नजर हटत नाहीये. वकिलाच्या भूमिकेत सूर्या इतका समरस झाला आहे की प्रत्यक्ष आयुष्यातही तो वकिलीचेच धडे गिरवून झाला आहे का, असा प्रश्न मनात घर करतो. 

सूर्याच्या अभिनयातील प्रत्येक दृश्य चित्रपटात जीव ओततं. तर, चित्रपटातील भावनिक दृश्य डोळ्यांच्या कडा पाणावून जातात. 90 च्या दशकातील काळ चित्रपटातून सुरेखरित्या साकारण्यात आला आहे. समाजात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काही घटकांचं अस्तित्वंच फार महत्त्वाची भूमिका बजावून जातं. ‘जय भीम’ हा त्याच घटकांपैकी एक ठरु शकतो.