Indian Singer Bold Declaration: प्रसिद्ध अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांजने रविवारी अहमदाबादमधील आपल्या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासंदर्भात जाहीर विधान केलं. तेलंगण राज्य सरकारने दिलजीत दोसांजला नोटीस पाठवली असून त्याच पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केलं आहे. हैदराबादमधील कॉन्सर्टआधी तेलंगण सरकारने दिलजीतला त्याच्या गाण्यांमधून मद्याचा उल्लेख वगळण्याचा आदेश दिला होता. याचसंदर्भात बोलताना दिलजीतने बोलताना सर्वच राज्यांनी मद्यावर बंदी घालण्याची मोहीम सुरु करावी अशी मागणी केली आहे.
आपल्या गाण्यांमध्ये आपण मद्याचा उल्लेख करु नये असं वाटत असेल तर त्यांनी आधी भारतामध्ये सगळीकडे दारुबंदी केली पाहिजे, असं दिलजीतने आपली भूमिका मांडता म्हटलं. दिलजीतने अनेक कलाकारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे, जे वेगवेगळ्या मद्य विक्री करणाऱ्या कंपन्यांची जाहिरात करतात. "चला सगळ्यांनी एक मोहीम सुरु करुयात, जर सगळ्या राज्यांनी मद्यपानाच्या सेवनावर पूर्णपणे बंदी घातली तर मी कधीच पुन्हा मद्याबद्दलचं गाणं गाणार नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी असं गाणं गाणार नाही हा माझा शब्द आहे, हे शक्य आहे का?" असा सवाल दिलजीत दोसांजने विचारला आहे.
दिलजीत दोसांजने कोरोना कालावधीमध्ये सगळं काही बंद असताना केवळ मद्यविक्रीची दुकानं सुरु होती याचीही आठवण करुन दिली. "कोरोना कालावधीमध्ये सर्व काही बंद असताना केवळ मद्यविक्री करणारी दुकानं सुरु होती. तुम्ही तरुणाईला वेड्यात काढू शकत नाही. पूर्णपणे बंदी शक्य नसली तर किमान माझे कार्यक्रम असतील त्या दिवशी तुमच्या राज्यात तुम्ही ड्राय डे घोषित करुन दाखवा. असं केलं तर मी मद्यासंदर्भातील एकही गाणं गाणार नाही," असं दिलजीत दोसांज म्हणाला.
"मी स्वत: मद्यपान करत नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मद्यांच्या जाहिराती करतात. मात्र मी अशी जाहिरातही करत नाही. मला उगाच छेडू नका. मी शांततेत माझे कार्यक्रम करतो आणि निघून जातो," असं दिलजीत दोसांज म्हणाला.
परदेशी कलाकारांनी कधीच आपल्या देशात अशाप्रकारच्या नोटीस दिल्या जात नाहीत. ते भारतात येऊन मुक्तपणे कार्यक्रम सादर करु शकतात. मात्र आता या यंत्रणा आपल्याच देशातील कलाकारांवर बंधन घालू पाहत आहेत, असं दिलजीत दोसांजने हैदराबादमधील कार्यक्रमाआधी आलेल्या नोटीशीवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं होतं.