नवी दिल्ली : दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे.
कराचीमध्ये होणाऱ्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात (पीआयएफएफ) 'बाहुबली'ची स्क्रिनिंग होणार आहे. या स्क्रिनिंगबद्दल दिग्दर्शक राजामौली खूपच उत्साहीत आहेत.
राजामौली यांनी बुधवारी याबद्दल एक ट्विट केलंय. 'बाहुबलीनं मला अनेक देशांची यात्रा करण्याची संधी दिली... त्यातील सर्वात जास्त रोमांचकारी यात्रा आहे पाकिस्तानची... यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवाचे, कराचीचे आभार' असं त्यांनी म्हटलंय.
Baahubali has given me opportunities to travel to a number of countries... The most exciting of them all is now, Pakistan. Thank you Pakistan international film festival, Karachi for the invite.
— rajamouli ss (@ssrajamouli) March 28, 2018
न्यूज एजन्सी 'आयएएनएस'नुसार, हा चार दिवसीय सिने महोत्सव गुरुवारपासून सुरू होत आहे आणि १ एप्रिल रोजी तो संपुष्टात येईल. 'बाहुबली'शिवाय पाकिस्तानत होणाऱ्या या सिनेमहोत्सवात डिअर जिंदगी, आँखो देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निल बटे सन्नाटा, साँग ऑफ द स्कॉर्पियन्स आणि मराठी सिनेमा सैराट हे सिनेमे दाखवले जदाणार आहेत.
या चार दिवसांच्या सिनेमहोत्सवात भारत आणि पाकिस्तानसहीत जगभरतील अनेक सिनेमे, शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेटरी दाखवल्या जाणार आहेत.
पाकिस्तानात दाखवला जाण्यापूर्वी 'बाहुबली' तैवानच्या गोल्डन हॉर्स फिल्म फेस्टिवल, पॅरीस आणि मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवला जाणार आहे. या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० करोडचा आकडा गाठला होता.