अनुष्काच्या अभिनयावर भाळला विराट, म्हणाला...

अनुष्का शर्मा हिचं आणखी एक वेगळं रुप 'झिरो' या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. 

Updated: Dec 23, 2018, 03:41 PM IST
अनुष्काच्या अभिनयावर भाळला विराट, म्हणाला...  title=

मुंबई :  आव्हानात्मक  भूमिका साकारत हिंदी चित्रपट विश्वात आपलं वेगळं स्थान प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचं आणखी एक वेगळं रुप 'झिरो' या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती एका अपंग शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसत आहे.  तिच्या याच भूमिकेविषयी खुद्द पती विराट कोहली याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटात अनुष्काने 'आफिया युसूफझाई भिंदर'ची भूमिका साकारताना दिसत आहे. अतिशय हुशार आणि चिकाटीने आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रीत करणाऱ्य़ा आफियाची भूमिका साकारता अनुष्काने केलेला अभिनय हा चित्रपटात अनेकांचच लक्ष वेधून जातो. तिच्या बोलण्याच्या शैलीपासून ते अगदी व्हीलचेअरवर वावरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत अभिनय़कौशल्य पणाला लागल्याचं पाहायला मिळतं. परिणामी अनुष्काच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनंही जिंकलं आहे. 

तिची ही भूमिका, 'झिरो' हा चित्रपट पाहिल्यानंतर, विराटने एक ट्विट करत तिची प्रशंसा केली. चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला तो नेमका कसा वाटला याविषयी लिहित त्याने अनुष्काची भूमिका सर्वाधिक भावल्याचं स्पष्ट केलं. सोबतच ती भूमिका आव्हानात्मक होती हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं. 

विराटने नेहमीच अनुष्काच्या विविध भूमिकांची प्रशंसा केली आहे. इतकच नव्हे तर अनुष्काही त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीविषयी नेहमीच आपली मतं मांडत असते. एकमेकांच्या क्षेत्राप्रती, कामाप्रती आदर दाखवत ही जोडी नेहमीच आपल्या कृतीतून #CoupleGoals देतात असं म्हणायला हरकत नाही.