मुंबई : किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानने 1992 मध्ये 'दीवाना' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर शाहरुख खानने कधी मागे वळून पाहिलंच नाही. आज शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर हजारो लोकं बाहेर जमतात. मुंबईतील शाहरुख खानचं घर 'मन्नत' त्याच्या चाहत्यांसाठी हे पर्यटनस्थळ आहे. 'मन्नत'पूर्वी शाहरुख खान आणि गौरी खान वांद्रे येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहत होते.
त्याचबरोबर शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्यातील फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचा बंगला गौरी खानने खूप सुंदरपणे डेकोरेट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि गौरीला त्यांच्या घरी एक पूजा रुम हवी होती ज्यासाठी त्यांना खूप जागा हवी होती. त्याचवेळी, 2019 मध्ये, एका रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने त्याचं घर मन्नतबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'मी दिल्लीचा आहे आणि दिल्लीकरांकडे राहण्यासाठी इथल्यापेक्षा मोठी घरं आहेत.
प्रत्येकजण मुंबईत अपार्टमेंटमध्ये राहतो. मी मुंबईत आलो तेव्हा माझी पत्नी गौरी आणि मी एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो. माझ्या सासूबाई म्हणायच्या, 'तू एवढ्या छोट्या घरात राहतोस'.पण मी 'मन्नत' पाहिल्यावर मला हा बंगला दिल्लीचा महाल वाटला आणि म्हणूनच मी तो विकत घेतला. मी विकत घेतलेली ती सर्वात महागडी गोष्ट होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याची किंमत 200 कोटींहून जास्त आहे. खरं तर, शाहरुख खानने मन्नतला 1997 मध्ये त्याच्या 'येस बॉस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिलं होतं. शाहरुखच्या आधी हा बंगला गुजराती व्यापारी नरिमन दुबाश यांचा होता आणि बाई खोरसेद यांच्या नावाने नोंदणीकृत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने 2001 मध्ये हा बंगला 13.32 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर 2005 मध्ये शाहरुख खान आणि गौरीने बंगल्याचं नाव 'मन्नत' ठेवलं.