गोष्ट सनीच्या बॉलिवूडमधल्या पदार्पणाची

सनी लिऑन, भेलेही आज एक प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रेटी आहे. पण, एक काळ होता सनी हा अनेकांच्या तुसडेपणाचा आणि टाळण्याचा विषय होता. जणू काही भूतकाळ वगळता जगात करण्यासारखे सनीसाठी काहीच नाही. नेमकं याच वेळी सनी करिअरचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी संघर्ष करत होती. तिचा मार्ग होता अगदी एकलकोंडा...   

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 7, 2017, 01:36 PM IST
गोष्ट सनीच्या बॉलिवूडमधल्या पदार्पणाची title=

नवी दिल्ली : सनी लिऑन , भलेही आज एक प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रेटी आहे. पण, एक काळ होता सनी हा अनेकांच्या तुसडेपणाचा आणि टाळण्याचा विषय होता. जणू काही भूतकाळ वगळता जगात करण्यासारखे सनीसाठी काहीच नाही. नेमकं याच वेळी सनी करिअरचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी संघर्ष करत होती. तिचा मार्ग होता अगदी एकलकोंडा...

आपल्याला टाळू पाहणाऱ्या समाजासोबत संघर्ष करत त्याच समाजात सेलिब्रेटी होणे ही सोपी गोष्ट नाही. पण, सनीने ते आव्हान पेलले. आपला भूतकाळ विसरून ती आज यशस्वीपणे त्याच समाजासमोर आहे, ज्या समाजाने आजवर तिची हेटाळणीच केली होती. हा मार्ग नक्कीच खडतर होता. सनीला बॉलिवूडमध्ये यायचे होते आणि बॉलिवूड तिला सामावून घेत नव्हते. सनीचे ऑर्गनायजर बॉलिवूडच्या एखाद्या सेलिब्रेटीसोबत तिचा शो ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे. पण, सनीसोबत स्टेज शेअर करायचे म्हटले की, अनेकजण नकारच द्यायचे. ही वेळ सनीसाठी अत्यंत खडतर होती.

सनी सोबत असे होणेही स्वाभाविक होते. कारण, सनीचा भूतकाळ केवळ बॉलिवूडच नव्हे तर, भारतातील आणि जगातील असंख्य नागरिकांना माहीत होता. अर्थात सनीने जे केले ते ठरवून आणि राजरोस. त्यात कोणताही आडपडदा नाही. अनेकांनी त्याचा आनंदही घेतला. भारतातही ही संख्या कमी नाही. गुगल सर्चमध्ये सनीचे टॉपला असणे बरेच काही सांगून जाते. पण, असे असले तरी, भारतासारख्या देशात सनीला स्वीकारणे तसे कठीणच होते. कारण, खजूराहो सारख्या मंदिरातील शिल्पांवर टीका करणाऱ्या आणि स्त्रीला देवी मानणाऱ्या या देशात सनीचा भूतकाळ खळबळजनक ठरला नसता तरच नवल. त्यामुळे सनी सोबत स्टेज शेअर करून नसती आफत कोण ओढवून घेईल?

....पण, सनी मोठी धीराची. तिने हावा तेवढा वेळ घेतला. दरम्यान, तिला 'बिग बॉस' हा कलर्स वाहिनीवरचा एक शो मिळाला. त्या शोमुळे ती प्रसिद्ध झाली. पण, पुढे फार काही घडत नव्हते. जणू काही अवघे बॉलिवूड सनीच्या विरोधात होते. मात्र, तेव्हा एकच व्यक्ती सनीसोबत काम करण्यास तयार झाला. त्या व्यक्तीचे नाव आहे चंकी पांडे. स्वत: सनीनेच याबाबत खुलासा केला आहे. 'नो फिल्टर नेहा' या अभिनेत्री नेहा धुपियाच्या शोमध्ये सनी बोलत होती. सनी म्हणाली 'मी जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा, माझ्यासोबत कोणीच नव्हते. माझ्यासोबत काम करण्यास कोणीच तयार नव्हते. मी निराश व्हायचे. पण, अशा स्थितीत एक व्यक्ती मात्र माझ्यासोबत काम करण्यास तयार झाला. त्याचे नाव होते चंकी पांडे'. सनी सांगते की, 'केवळ कोणी एक्टरच नव्हे तर, एखादी एक्ट्रेसही माझ्यासोबत काम करण्यास तयार होत नव्हती. उलट, माझ्या असण्याचा त्यांना त्रासच होत असायचा'.

...काळ हे सर्व गोष्टींवरचे रामबाण औषध. आज काळ बदलला सनी लिऑन ला बॉलिवूडने स्विकारले आहे. इतकेच नव्हे, बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता शाहरूखच्या चित्रपटातही ती आयटम सॉंग करते. विविध अॅवॉर्ड शोमध्ये तिला आवर्जून बोलावले जाते. ट्विटरवही तिचे फॉलोअर्स लाखोच्या घरात आहेत. सनीने आजय देवगणचा चित्रपट 'बादशाहो'मध्ये नुकतेच एक आयटम सॉंग केले आहे. तर, तिचे पुढचे आयटम सॉंग संजय दत्तच्या 'भूमी' चित्रपटात असणार आहे. हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.