पूर्ण ताकदीनिशी मी लवकरच परतेन- कपिल शर्मा

 ‘द कपिल शर्मा शो’ अतिशय लोकप्रिय ठरला असला तरी नंतर मात्र त्याच्यावरून अनेक वाद रंगले. शो बद्दल अनेक चर्चा झाल्या, अफवा पसरल्या पण शेवटी तो बंद झालाच. हे ऐकून अनेक प्रेक्षकांची निराशा झाली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 1, 2017, 07:21 PM IST
 पूर्ण ताकदीनिशी मी लवकरच परतेन- कपिल शर्मा  title=

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ अतिशय लोकप्रिय ठरला असला तरी नंतर मात्र त्याच्यावरून अनेक वाद रंगले. शो बद्दल अनेक चर्चा झाल्या, अफवा पसरल्या पण शेवटी तो बंद झालाच. हे ऐकून अनेक प्रेक्षकांची निराशा झाली.

कपिलची तब्येत बरी नसल्याने शूटींग रद्द झाल्याच्या बातम्या काही दिवसांपासून कानी येत होत्या. या शोचा एकही एपिसोड चित्रित न झाल्याने वहिनीला याचा फटका बसत होता. त्यामुळेच ‘द कपिल शर्मा शो’ला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतलाय. कपिलची तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा हा शो सुरु करण्यात येईल. वाहिनीच्या या निर्णयावर कपिलने आपले मत व्यक्त केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्यामुळे त्याचा त्रास वहिनीला होत होता. म्हणून मी ब्रेक घेतलाय. वाहिनीने माझा निर्णय स्विकारल्याबद्दल मी सोनी वाहिनीचा आभारी आहे. सध्या मला माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही व्यग्र वेळापत्रक असेल. त्यामुळे आता आराम करणे गरजेचे आहे. पण मी लवकरच पूर्ण ताकदीनिशी परतेन, असे कपिल म्हणाला. 

कपिलची तब्येत बरी नसल्याने शाहरुख- अनुष्का, अक्षय- भूमी, अर्जुन कपूर- अनिल कपूर या सेलिब्रिटींना एपिसोड शूट न करताच परतावे लागले होते. कपिलच्या शोचा एकही नवीन एपिसोड प्रसारित करण्यासाठी तयार नव्हता. जुने एपिसोड प्रसारित करुन प्रेक्षकांना निराश करु नये यासाठी हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ‘द कपिल शर्मा शो’ची जागा ‘द ड्रामा कंपनी’ घेणार आहे.