बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पत्नी सुझान खानचा आज 48 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिचा प्रियकर अर्सलन गोनी याने इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने फोटो एकत्रित करत हा व्हिडीओ तयार केला आहे. तसंच या व्हिडीओसह एक पोस्टही लिहिली आहे. यावर सुझान खाननेही कमेंट केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर सुझान खानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशननेही कमेंट केली आहे.
अर्सलन याने सुझान खानचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माय लव्ह सुझान खान...सर्वप्रथम मी याक्षणी तुझ्यासोबत नाही याचं मला वाईट वाटत आहे. पण हे पाहणं किती आनंददायक आहे. आपण काही गोष्टी गमावू शकतो पण नक्कीच चांगल्या आठवणी बनवतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला जगातील सर्व आनंद मिळो अशा शुभेच्छा देतो. शब्द दिल्याप्रमाणे आपण जेव्हा कधी भेटू तेव्हा आनंद साजरा करु. मला पुन्हा विश्वासू बनवल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू.. हे फक्त आपल्याला समर्पित आहे".
अर्सलनच्या या पोस्टवर सुझान खानने कमेंट केली आहे. तुझ्या निमित्ताने मला सर्वात चांगली भेट मिळाली असल्याचं ती म्हणाली आहे. "Myyyyyyyyy Love my Jaaanuuuu. तू माझे सर्वस्व आहेस. मी या ग्रहावरील आणि जगातील सर्वात भाग्यवान महिला आहे. तुझ्या निमित्ताने मला सर्वोत्तम भेट मिळाली आहे".
सुझान खानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशननेही या पोस्टवर कमेंट केली आहे. "वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो," असं हृतिकने लिहिलं आहे.
सुझान खानचं अभिनेता हृतिक रोशनसोबत लग्न झालं होतं. 2000 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुलं आहेत. हृतिक रोशन सध्या अभिनेता-संगीतकार सबा आझादला डेट करत आहे. या जोडप्याला अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते.
इंटिरिअर डिझायनर असण्याव्यतिरिक्त, सुझान खान मलायका अरोरा आणि बिपाशा बसूसह 'द लेबल लाइफ' नावाचा ब्रँड चालवते. तिने गोव्यातील एका रेस्टॉरंटचे इंटिरिअरही केलं आहे.