दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : प्रत्येक मुलीसाठी आपला ‘बाप’ सुपरहिरोच असतो. वेणूसाठी पण तिचा बाप सुपरहिरोच आहे. आणि वेणूच्या बापाने आपल्या मुलीला तिच्या वाढदिवशी अशी काय भेट दिली ना की जी भेट ‘बापच’ म्हणावी लागेल. हा वेणूचा ‘बाप’ म्हणजे अभिनेता विनोद गायकर. त्याने आपल्या लेकीला अशी काही भेट दिली की पुढच्या अनेक पिढ्या वेणूला आणि वेणूच्या बापाला म्हणजेच विनोद गायकरला कायम स्मरणात ठेवतील. एकीकडे बालसाहित्य दुर्लभ होत असताना विनोदने चक्क १०० गोष्टींचं लहान मुलांसाठी पुस्तकच लिहीलं.
यामध्ये वेणूच्याच नव्हे तर तिच्या वयाच्या मुलांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत. गणपती बाप्पा लहान मुलांच्या आवडीचा म्हणून 'गणूच्या गोष्टी', वेणूला 'फाईंडिंग द निमो' हा सिनेमा फार आवडतो म्हणून समुद्र विश्वातल्या गोष्टी... वेणूकडे डोनाल्ड डक टेडीबेअर आहे म्हणून 'डिटेक्टिव्ह डकीच्या गोष्टी' येणारा काळ हा SCI FI चा असणार आहे म्हणून रोबोटच्या म्हणजेच 'सुपर सोनेरीच्या गोष्टी...' प्राण्यांच्या गोष्टी, जादूच्या गोष्टी, राजा प्रधानाच्या गोष्टी, ढोलू मोलूच्या विनोदी गोष्टी...
शास्त्रज्ञांच्या गोष्टी, खेळाडूंच्या गोष्टी,साधुसंतांच्या, गौतम बुद्धांच्या, महाराजांच्या गोष्टी आणि ज्यांच्यामुळे विनोद इन्स्पायर झाला त्या सर्व गोष्टी. पुस्तकाला शीर्षक दिलंय ‘वेणूच्या गोष्टी’. या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा होतेय. लॉकडाऊनचा काळ सदुपयोगी लावून अभिनेता विनोद गायकरने लेकीला हे खास गिफ्ट दिलं आहे. या पुस्तकांत चित्र रुपातील गोष्टी आहेत. त्यामुळे लहान मुलांना या नक्कीच आकर्षित करतील.
हॅपी बर्थडे वेणू गोष्ट मुलांचे मनोरंजन करते, त्यांना काल्पनिक विश्वात घेऊन जाते, त्याचप्रमाणे गोष्ट मुलांवर...
Posted by Vinod Gaikar on Tuesday, October 27, 2020
'मला आणि माझ्या बायकोला श्रद्धाला पुस्तकं वाचायला आवडतात. हीच आवड आमच्या वेणूमध्ये देखील आहे. तिच्या वाढदिवसाला तिला हे खास गिफ्ट द्यायचं होतं. जे तिच्या भावविश्वात तिला रमवणारं असेल. वेणूला आणि कुटुंबियांना हे सरप्राईज खूप आवडलं. हे पुस्तकं मी फक्त वेणूसाठी लिहायचा विचार केला आणि तसंच लिहिलं गेलं. पण आता या पुस्तकाला खूपच छान प्रतिसाद मिळत आहे. कर्मशिअल असा मी या पुस्तकाचा विचार केला नव्हता. पण आता सगळ्यांचा विचार पाहता. हे पुस्तकं लवकरच छोट्या दोस्तांसाठी उपलब्ध करेन', असं अभिनेता आणि वेणूचा बाबा विनोद गायकर सांगतो.
बरं हा एवढ्यावरंच थांबला नाही तर त्याने लेकीसाठी गाणं सुद्धा तयार केलंय. खालील लिंकवर जाऊन गाणं ऐका. मस्त गाणं झालंय.
वेणू, हॅप्पी बर्थडे. २७ ऑक्टोबरला वेणूचा पाचवा वाढदिवस झाला. खूप लकी आहेस बाळा. तुझे पप्पा खरे सुपरहिरो आहेत. तुला जे आज त्यांनी पुस्तक दिलंय ना ते पुस्तक तुझ्यासारख्या कित्येक मुलांचं भावविश्व बदलवेल. मी जे काही बोलते ते तुला आता नाही कळणार. पण मोठी झालीस की त्याचा अनुभव घेशील.