'दयाबेन' घेणार एक्झिट; निर्माते नव्या चेहऱ्याच्या शोधात

दिशा या मालिकेत परतण्यास असमर्थ असेल तर....

Updated: Mar 28, 2019, 07:48 AM IST
'दयाबेन' घेणार एक्झिट; निर्माते नव्या चेहऱ्याच्या शोधात  title=

मुंबई : 'हे माँ... माताजी...' असं म्हटलं की एक चेहरा नेहमीच डोळ्यांसमोर येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी हिचा. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या निमित्ताने दिशा घराघरात पोहोचली ते म्हणजे तिने साकारलेल्या 'दयाबेन गडा' या भूमिकेमुळे. पण, गेल्या काही दिवसांपासून दिशा ही मालिकेपासून दूर असून आता मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्याऐवजी एका नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु केला असल्याचं म्हटलं जात आहे. जिच्यावर 'दयाबेन' या पात्राची धुरा सोपवण्यात येणार आहे. खुद्द असित कुमार मोदी यांनीच याविषयीची माहिती दिली. 

'एनडिटीव्ही'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिशाला मालिकेच्या चित्रीकरणाकरता परतण्याविषयी दिलेल्या नोटिसबद्दल सांगताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. 'आम्ही त्यांना नेहमीच सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना मुलीच्या जन्मानंतर मालिकेच्या कामासाठी त्या परतण्याची वाटही आम्ही पाहिली. बऱ्याच संयमाने  या गोष्टी होत होत्या. त्यांना आम्ही बराच वेळही दिला होता. पण, अखेर आम्हालाही एक मालिका सुरु ठेवायची आहे. प्रदीर्घ काळासाठी आम्ही कोणाचीही वाट पाहूच शकत नाही', असं असित कुमार मोदी यांनी स्पष्ट केलं. 'दयाबेन' हे पात्र 'गोकुळधाम'मध्ये आणि या मालिकेत परतण्याची गरज आहे. त्यामुळे जर दिशा या मालिकेत परतण्यास असमर्थ असेल तर, तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आपल्याकडे नसल्याचं मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्ट केलं. 

दिशाला पाठवण्यात आलेल्या नोटिसमध्ये कोणत्याही प्रकारचा शेवटचा निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरीही दिशाने येत्या काळात मालिकेविषयीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी ते आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. दिशा वकानीच्या अनुपस्थितीतही मालिका ही इतर कलाकारांच्या बळावर सुरुच असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या साऱ्या वातावरणात दिशाचा भाऊ, मयुर वकानी (सुंदरलाल) हा मालिकेत काम करणं सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिशा आणि 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या निर्मात्यांमध्ये असणारा हा तणाव मालिका विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता या साऱ्यावर दिशा कोणता निर्णय घेणार किंवा काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, दिशाने मालिकेत न परतण्याचा निर्णय घेतल्याच तिच्याऐवजी दयाबेन हे पात्र त्याच ताकदीने निभावणारा चेहरा कोणाचा असेल, हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे.