मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे दिसणारे एमपी रामचंद्रन लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत, ते या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत. एमपी रामचंद्रन यांचा फोटो २०१७ मध्ये इंटरनेटवर व्हायरल झाला होता. या फोटोत ते हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसत होते. व्हायरल झालेल्या फोटोत ते हातात असलेल्या मोबाईलवर काहीतरी पाहत होते आणि त्यांच्या खांद्यावर बॅग टांगलेली होती. ते रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत होते, तेव्हा एका विद्यार्थ्याने त्यांचा फोटो काढून फेसबुकवर टाकला. फोटोच्या खाली त्या मुलाने लिहिलं होतं, पीएम मोदी पय्यानूर स्टेशनवर.
आता, ६४ वर्षांचे रामचंद्रन कन्नड चित्रपट 'स्टेटमेंट 8/11' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी ८ नोव्हेंबर २०१६च्या नोटबंदीवर आधारीत आहे. ज्यात देशाभरातील लोकांचं जीवन प्रभावित झालं होतं. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अप्पी प्रसाद यांनी केलं आहे. केएच वेनू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाविषयी बोलताना रामचंद्रन म्हणतात, मला वाटत होतं की एखाद्या चित्रपटात मी पीएम मोदीची भूमिका करावी.
हा चित्रपट २७ एप्रिल रोजी रिलीज होणार होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रामचंद्रन मुंबईतील एका स्टील कारखान्यात काम करतात, आपल्या जीवनाविषयी ते सांगतात, मी तोपर्यंत काम केलं जोपर्यंत माझ्या दोन्ही मुलांना नोकरी मिळत नाही, त्यांची दोन्ही मुले आयटी फर्ममध्ये काम करतात. यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली आता ते धार्मिक स्थळांना भेटी देतात. 'स्टेटमेंट 8/11' या चित्रपटाची रिलीज डेट अजून ठरलेली नाही.