#MeToo सेक्स सीनचं चित्रीकरण करताना आता घेणार 'ही' काळजी

यापुढे चित्रीकरण करताना....

Updated: Oct 29, 2018, 11:35 AM IST
#MeToo सेक्स सीनचं चित्रीकरण करताना आता घेणार 'ही' काळजी title=

मुंबई : हॉलिवूडमध्येच सुरु झालेल्या आणि आता प्रचंड चर्चेत असणाऱ्या #MeToo या चळवळीनंतर काही प्रशंसनीय निर्णय निर्मिती संस्था आणि प्रसिष्ठित वाहिन्यांकडून घेण्यात आल्याचं कळत आहे. 

'आयडीएन इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'एचबीओ'कडून 'इंटीमसी कोऑक्डीनेटर' या पदावर एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असून, सेक्स सीन्सवर या व्यक्तीची नजर असणार आहे. 

सेक्स सीनच्या चित्रीकरणासाठीचे आवश्यक आणि कलाकारांच्या दृष्टीने सुरक्षित निकष या व्यक्तीकडून सांगण्यात येणार आहेत. 

डेव्हिड सिमॉन्स यांच्या 'द ड्युस', डेव्हिड मायकल यांच्या 'डेडवूड्ज मुव्ही' आणि डॅमन लिंडल्फ यांच्या आगामी 'वॉचमेन' या सीरिजसाठी ही तरतूद करण्यात आल्याचं कळत आहे. 

'द ड्युस' या सीरिजच्या एमीली मिड या या अभिनेत्रीने आपल्याला सेक्स सीनचं चित्रीकरण होतेवेळी सेटवर एखाद्या अॅडव्होकेटची उपस्थिती महत्त्वाची वाटते अशी मागणी केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

एमीलीच्या मागणीनंतर एचबीओकडून इंटिमसी डिरेक्टर्स असोसिएशनच्या सह-संस्थापिका अॅलिसीया रोडिस यांची निवड करण्यात आली. 

एखाद्या सेक्स सीनचं चित्रीकरण करतेवेळी समोरच्या वयक्तीची मानसिक आणि शारीरिक परिस्थितीसुद्धा यापुढे नजरेत घेण्यात येणार आहे. त्याशिवाय या दृश्यांचं चित्रीकरण करतेवेळी काही बाबतीत शिष्ठाचारही पाळला जाणार आहे. त्यामुळे एचबीओकडून घेण्यात आलेला हा निर्णय सध्या कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. 

निर्माते आणि दिग्दर्शकांपुढे आपल्या अडचणी मांडण्यात संकोचलेपणा वाटणाऱ्या कलाकारांना मोकळेपणाने व्यक्त होता यावं यासाठी हा मार्ग निवडण्यात आल्याचं कळत आहे, असं वृत्त 'रोलिंग स्टोन' या मासिकाने प्रसिद्ध केलं आहे.