दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सध्या मुंबईत असून वर्ल्डकपमधील भारत-न्यूझीलंड सेमी-फायनल सामन्याला त्याने हजेरी लावली होती. दरम्यान डेव्हिड बेकहॅमसाठी मुंबईत अनेक बॉलिवूड तसंच उद्योग जगतातील अनेकांनी पार्टीचं आयोजन केलं आहे. नुकतंच डेव्हिड बेकहॅमने अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत काही मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूरचाही समावेश होता. त्याने सोशल मीडियावर फुटबॉलपटूसह एक फोटोही शेअर केला. पण यावरुन एका युजरने त्याला तू कोण आहेस हे तरी माहिती होतं का? अशी विचारणा करत ट्रोल केलं. यावर हर्षवर्धन कपूरने त्याला उत्तर दिलं आहे.
सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी डेव्हिड बेकहॅमसाठी मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. हर्षवर्धन कपूरने या पार्टीला हजेरी लावत डेव्हिड बेकहॅमसह काढलेला एक फोटो इंस्टाग्रामला शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, "त्या पार्टीत मी कदाचित एकमेव अशी व्यक्ती होतो ज्याने बेकहॅमने खेळलेला प्रत्येक सामना पाहिला आहे आणि त्याच्या कारकिर्दीला फॉलो केलं आहे. मला त्याच्यासह फोटो काढावासा वाटला..प्रत्येकजण फोटो शेअर करत असताना मलाही हा फोटो शेअर करावासा वाटत आहे".
हर्षवर्धन कपूरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या. एका युजरने पोस्टवर कमेंट करत विचारणा केली की, डेव्हिड बेकहॅमला तू कोण आहेस हे माहिती होतं का?. त्याने तू कोण आहेस हे विचारलं का? असं त्याने लिहिलं आहे.
हर्षवर्धन कपूरने या युजरला उत्तर दिलं. "भावा तो माझ्या घरी आला होता, तू कोण आहेस?," असं उत्तर देत हर्षवर्धन कपूरने ट्रोल करणाऱ्याला शांत केलं.
युनिसेफचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून डेव्हिड बेकहॅम तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्याने अनेक पार्टी आणि कार्यक्रमात भाग घेतला आहे. मुंबईतील मेटा ऑफिसमध्ये साराने त्याची मुलाखत घेतली. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या पार्टीशिवाय बेकहॅमने गुरुवारी अँटिला येथे अंबानी कुटुंबीयांची भेट घेतली. गुरुवारी रात्री शाहरुख खानने आयोजित केलेल्या एका खासगी पार्टीतही तो सहभागी झाला होता.