मुंबई : गणपती म्हणजे बुद्धिची आणि कलेची देवता, असं वर्णन वेद- पुराणांमध्ये करण्यात आलं आहे. आपल्यावरही बालपणापासून होणाऱ्या संस्कारांमधून गणरायाची पहिलीवहिली ओळखही अशीच करुन दिली जाते. अशा या कलाधिपती गणरायाची प्रतिष्ठापना नुकतीच सर्वांच्या घरोघरी आणि अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये झाली आहे. याच लाडक्या गणरायाचं रुप साकारण्यासाठी यंदाच्या वर्षी अभिनेता रितेश देशमुख याच्या मुलांनी बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं.
यंदाच्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं खुद्द रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया या दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या मुलांचा म्हणजेच रियान आणि राहीलचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ते पर्यावरणस्नेही अशी गणरायाची मूर्ती साकारताना दिसत आहेत. रितेशच्या मुलांनी हा बाप्पा साकारला आहे तो म्हणजे वर्तमानपत्रांपासून.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कलेशी मुलांना जोडू पाहणारी ही शक्कल अनेक पालकांचंही मन जिंकत आहे. देवा श्री गणेशा या गाण्याचे बोल आणि व्हिडिओमध्ये मूर्ती साकारताना मोठ्या कुतूहलानं त्यासाठी मेहनत घेणारी ही लहान मुलं सर्वांचीच मनं जिंकत आहेत.
कागदाचे गोळे तयार करण्यापासून ते मूर्तीच्या आकारामध्ये व्यवस्थित बसवून देण्यापर्यंतच्या या प्रक्रियेत अर्थात रितेशनंही हातभार लावला. हे व्हिडिओ पाहताना लक्षात येतं. मूर्तीवर रंगकाम करतेवेळीचा मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा. अतिशय सोपा, सुरेख आणि रेखीव असा हा बाप्पा साकार झाल्यानंकर फुलांची आरास करत त्याला आसनस्थ केल्यानंतर उठून दिसणारं रुप पाहता खरंच कलाधिपती गणरायानं देशमुखांच्या या दोन्ही बाल कलाकारांना आणि अर्थातच सर्वांना असंख्य आशीर्वाद दिले आहेत याचीच अनुभूती होते.