मुंबई : ‘FU’ आणि मुरांबा हे दोन मराठी चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहेत. यानिमित्त दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी म्हणजेच महेश मांजरेकर आणि नितीन वैद्य यांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडे प्रतिस्पर्धी म्हणून बघितले जाते. परंतु ‘FU’ आणि मुरांबाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी परस्परांना प्रतिस्पर्धी न मानता दोन्ही चित्रपट उत्तम असून प्रेक्षकांनी दोन्ही सिनेमांना
भरभरून प्रतिसाद द्यावा असे एकत्रित आवाहन या पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेत बोलताना ‘FU’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर म्हणाले की, ‘मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत अशी चर्चा एकीकडे सुरु असतानाच व्यावसायिक दृष्ट्या मराठी चित्रपट तितकेसे यशस्वी होताना दिसत नाहीत.
वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्त आहे आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहांची संख्या कमी आहे आणि मराठी चित्रपटांची स्पर्धा फक्त मराठी चित्रपटांशी नसून हिंदी, इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांशी देखील आहे. त्यामुळे बरेचदा मराठी चित्रपट आशयघन असूनसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहेत आणि जर व्यावसायिकदृष्ट्या मराठी सिनेमांची अशीच पिछेहाट होत राहिली तर थोडेच दिवसात मराठी चित्रपटसृष्टीला श्रद्धांजली व्हायची वेळ येईल. हे जर टाळायचे असेल तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी देखील एकी दाखवून प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट आपला मानून त्याची प्रसिद्धी करणे गरजेचे आहे.’
‘मुरांबा’ या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य यांनी ‘गेल्या ११ वर्षात मराठी चित्रपटाचे सुमारे ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या जास्ती आहे परंतु आशयघन चित्रपटांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
निर्मात्यांनी आपापसात चित्रपटांच्या संख्येची स्पर्धा करण्यापेक्षा ‘FU’ आणि मुरांबा या सिनेमांप्रमाणेच गुणवत्तेची स्पर्धा करणारे सिनेमे बनवण्याची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्र शासनानेदेखील अनुदान देण्यापेक्षा करपरतीची योजना करून तिची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे जेणेकरून निर्मात्यांना आशयघन चित्रपटनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या चित्रपटगृहांची उभारणी करणे तितकेच गरजेचे आहे.’ असे मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत निर्मात्यांनी एकत्र येऊन निर्मात्यांची संघटना उभी करण्याची गरज आहे असादेखील प्रस्ताव मांडण्यात आला.
‘मुरांबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ज्याप्रमाणे हिंदी किंवा इतर भाषिक चित्रपट हे हिरो, इफेक्ट्स आदी कारणांमुळे गाजतात परंतु मराठी चित्रपटांमध्ये ‘आशयघन कथा’ हीच चित्रपटाचा खरा नायक आहे पण कथेसाठी चित्रपट बघण्याची मानसिकता मराठी प्रेक्षकांची नाही असे मत यावेळी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेत ‘FU’ आणि मुरांबा या चित्रपटाचे कलाकार म्हणजेच सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित, अमेय वाघ, आकाश ठोसर, मिथिला पालकर, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर , मयुरेश पेम हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी भाषेवरील प्रेम दाखवण्याची हीच वेळ आहे आणि मराठी चित्रपट चालणे ही आता प्रेक्षकांची जवाबदारी आहे असे मत व्यक्त करून अधिकाधिक प्रेक्षकांनी हे दोन्ही चित्रपट बघावे आणि सोशल मीडियाद्वारे त्यांची प्रसिद्धी करावी असे आवाहन केले.