'फ्रेण्ड्स' मालिकेतील प्रसिद्ध कलाकाराचे निधन

1993 साली टॉनी पुरस्काराने सन्मानित 

Updated: Dec 10, 2019, 10:30 AM IST
'फ्रेण्ड्स' मालिकेतील प्रसिद्ध कलाकाराचे निधन  title=

मुंबई : 'फ्रेण्ड्स' या जगप्रसिद्ध टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. लोकप्रिय अमेरिकन अभिनेता रॉन लिबमन यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. न्यूयॉर्कमध्ये रॉन लिबमन यांचे न्यूमोनियामुळे निधन झाले आहे. 

'फ्रेण्ड्स' मध्ये रॉन यांनी रेचल ग्रीनच्या वडीलांचे पात्र साकारले होते. या मालिकेत अगदी लगेचच चिडणाऱ्या गृहस्थाची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. १९५० पासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. आतापर्यंत अनेक सिनेमे आणि टीव्ही सीरिजमध्ये रॉन यांनी काम केलं आहे. 'फ्रेण्ड्स', 'लॉ अॅण्ड ऑर्डर','मर्डर शी रोट' यासारख्या अनेक लोकप्रिय कलाकृतीमध्ये रॉन यांचा सहभाग होता. 

न्यूयॉर्कमध्ये 11 ऑक्टोबर 1937 रोजी रॉन यांचा जन्म झाला होता. ओहिओ विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. 50 च्या दशकात त्यांनी नाटकांमध्ये काम केली त्यानंतर 1970 मध्ये 'Where's Poppa?' या कॉमेडी सिनेमांत त्यांनी काम केलं होतं. 

'अबराम्स आर्टीस्स' ही एजन्सी रॉन यांचे काम सांभाळत होती. या कंपनीकडून रॉन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. रॉन हे उत्तम अभिनेते होते. रॉन यांनी सिनेमा, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपली जादू पसरवली असं या वृत्तात म्हटलं आहे. रॉन यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे पत्नी जेसिका आहे.

रॉन यांना 1993 साली टॉनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच एंजल्स इन अमेरिका या सिनेमातील भूमिकेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.