Friend Request Play : सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी आलेली एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते. तुमचा विश्वास बसत नाही का ? मग रंगभूमीवर येणारे ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि 'व्यास क्रिएशन्स' या तीन संस्थांची निर्मिती असणारे ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक तुम्हाला पहावे लागेल. या नाटकाचे लेखन प्रसाद दाणी यांचे असून दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचे आहे. अभिनेते अजय पुरकर, आकाश भडसावळे तसेच शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड हे या नाटकाचे निर्माते आहेत.
चौघांचं आयुष्य एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' ने कसं बदलत जातं हे दाखवतानाच नात्यांचे वेगवेगळे कंगोरे आणि बंध यांचा उलगडा करणारं 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं नाटक आहे. प्रसिद्ध अभिनेते आशिष पवार, मालिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन आणि बाजीप्रभू, सुभेदार या भूमिका रंगवणारे अभिनेते अजय पुरकर हे या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. या नाटकाचा शुभारंभ येत्या 25 जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता, तर 26 जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9.30 वाजता होणार आहे. 1 फेब्रुवारी दुपारी 3.30 वा. श्री शिवाजी मंदिर,दादर येथे नाटकाचा शुभारंभ होईल.
मोजक्याच मंडळींसोबत आजच्या पिढीचं नाटक करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे या नाटकाची निर्मिती आणि अभिनय अशा दोन्ही बाजू सांभाळल्याचं अभिनेते अजय पुरकर सांगतात. दुधारी शस्त्र असलेल्या सोशल माध्यमाचा वापर आपण कशाप्रकारे करतो? हे खूप महत्त्वाचं ठरतंय. एखादी आलेली 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते का ? याची झलक दाखवणारं हे नाटक आहे. 'कुमार सोहोनी यांच्यासारख्या अनुभवी दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं हा एक उत्तम अनुभव होता. उत्तम सहकलाकारांमुळे छान टीम तयार झाली असून 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे नाटक रसिकांना सुरेख अनुभव देईल' असा विश्वासही अजय पुरकर व्यक्त करतात.
या नाटकाविषयी सांगताना दिग्दर्शक कुमार सोहोनी सांगतात की, 'फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हा लेखक प्रसाद दाणी याचा दीर्घांक; त्याचं उत्तम नाटक होऊ शकतं हे मला जाणवलं. आजच्या पिढीचं आणि नात्याच्या बंधाचा वेगळा नाट्यानुभव देणारं हे नाटक प्रेक्षकांनाही थक्क करेल असा विश्वास ते व्यक्त करतात.
हेही वाचा : 'Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही'; शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य
‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखनची जबाबदारी सांभाळली आहे. नेपथ्याची बाजू संदेश बेंद्रे यांची असून सूत्रधार दिगंबर प्रभू आणि व्यवस्थापक प्रशांत माणगांवकर आहेत. 'संगीत नाटक अकादमी' हा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणार्या कुमार सोहोनी यांनी आजवर अनेक दर्जेदार नाटकांची मेजवानी रसिकांना दिली आहे. ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटकही रसिकांना एक वेगळीच अनुभूती देईल हे नक्की.